विविध तलावात रात्री उशिरापर्यंत भाविकांकडून श्रीमूर्तींचे विसर्जन
प्रतिनिधी / बेळगाव
गणरायाच्या आगमनाची ओढ सर्वानाच असते. कधी बाप्पा येणार, याकडे लक्ष लागून असते. पण काही भाविक गणरायाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर विसर्जन करतात. त्यामुळे गुरुवारी दुपारनंतर दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यात आला. महानगरपालिकेच्या विसर्जन तलावांमध्ये विसर्जन करून बाप्पांना निरोप देण्यात आला. विविध ठिकाणी असलेल्या तलावावर रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले.
दोन वर्षे कोरोनामुळे सर्व भावनांना आवर घालून गणरायाचे स्वागत करावे लागले होते. मात्र यंदा गणरायाचे स्वागत मोठय़ा उत्साहाने आणि जल्लोषी वातावरणात करण्यात आले. बुधवारी सकाळपासून वाजत-गाजत गणरायांचे आगमन झाले.
सर्वत्र प्रति÷ापना करून गणरायाचा उत्सव आनंदात करण्यात आला. काही कुटुंबांमध्ये परंपरेनुसार दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे सर्व कुटुंब एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात. दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यासाठी गुरुवारी दुपारपासून विसर्जन करण्यास प्रारंभ करण्यात आला. कपिलेश्वर विसर्जन तलावावर गणरायाला निरोप देण्यासाठी सायंकाळी चार वाजल्यापासून भाविक दाखल झाले होते. तसेच जुनेबेळगाव, अनगोळ, वडगाव, जक्कीनहोंड येथे भाविकांनी गणरायांना निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत दीड दिवसाच्या बापाचे विसर्जन सुरू होते.
अंधारामध्ये करावे लागले विसर्जन
दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यासाठी विविध तलावांची स्वच्छता करण्यात आली आहे. पण दीड दिवसाच्या विसर्जनासाठी मनपा प्रशासनाकडूनही योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. रामेश्वरतीर्थ परिसरात दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पण याठिकाणी दिव्यांची व्यवस्था करण्यात आली नसल्याने अंधारामध्ये विसर्जन करावे लागले. एक दिवा लावण्यात आल्याने तलावाभोवती अंधार पसरला होता. वास्तविक पाहता, तलाव पाण्याने भरला असल्याने अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रखर दिव्यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच देखभाल करण्यासाठी मनपाच्या कर्मचाऱयांची नियुक्ती करणे गरजेचे होते. पण याकडे मनपा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केल्याने भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.









