वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गुरुवारी कंग्राळी बुद्रुक व कंग्राळी खुर्द परिसरात सार्वजनिक गणेशमूर्ती बरोबर घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करून सर्वांना सुख, समृद्धी लाभण्याची मागणी करत भक्तिभावाने निरोप देण्यात आला. कंग्राळी बुद्रुक येथे सकाळपासून गावाजवळील तलावामध्ये कसेच कलमेश्वर मंदिरजवळील सार्वजनिक विहिरीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन सुरू होते. रात्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरमधून गणेशमूर्तींची सवाद्य मिरवणूक काढत भावपूर्ण उत्साही वातावरणात विसर्जन करून निरोप देण्यात आला.
कलमेश्वर मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीजवळ ग्रा. पं. सदस्य अनिल पावशे यांनी माती टाकून जोसीबीने माती सपाट करुन भक्तांना घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन करण्याची चांगली सोय केल्यामुळे गणेशभक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी क्रेनच्या सहाय्याने सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कंग्राळी खुर्द व अलतगा परिसरामध्येही सकाळपासून मार्कंडेय नदीवर अलतगा फाट्याजवळ जुना पूल व अलतगा फाट्याजवळील बंधाऱ्याला अडविलेल्या पाण्यामध्ये घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करून गणरायाला भक्तीपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. मार्कंडेय नदीतील पाण्यामध्ये कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, अलतगा, शाहूनगर, नेहरुनगर, मार्कंडेय नगर, ज्योतीनगरसह बेळगाव शहरातील हजारो घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आल्या.
गौंडवाड भरम तलावात विसर्जन
गौंडवाडजवळील भरम तलावामध्ये मार्कंडेय नदीचे पाणी जलसिंचन योजनेद्वारे सोडून पाणी भरल्यामुळे गौंडवाड यमनापूर, इंडालनगर, काकती परिसरातील घरगुती गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले.









