यंदा दीड ते दोन तास आधीच गणरायांचे विसर्जन, दिमाखदार मिरवणुकीने पारणे फेडले
पुणे / प्रतिनिधी
रांगोळ्यांच्या पायघड्या…सनई चौघड्याची सुरावट…ढोल ताशांचा गजर…गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष…आकर्षक रथातील गणरायची मूर्ती..अन् गणेशभक्तांचा अपूर्व उत्साह…अशा भारावलेल्या वातावरणात शनिवारी मानाच्या पाच गणपतींना पुणेकरांनी भक्तिपूर्ण वातावरणात निरोप दिला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते दोन तास आधी मानाच्या गणपतेची मिरवणूक संपली.
सकाळी साडे नऊ वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास आणि मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गणरायाची आरती करून मुख्य मिरवणुकीला सुऊवात झाली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंज्ञ शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या प्रमुख नेत्यांसह विविध पक्षांतील राजकीय नेते या वेळी उपस्थित होते.
मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी साडे नऊ वाजता मुख्य विसर्जन मार्गावर येताच गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. मंडई, बेलबाग चौक ते टिळक चौकापर्यंत संपूर्ण लक्ष्मी रस्ता मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या ढोल-ताशा पथकांच्या वादनात दुमदुमून गेला. गणेशभक्तांनाही या पारंपरिक वादनाने थिरकायला लावले. पालखीतून आणि आकर्षक रथांमधून झालेल्या बाप्पाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी गणेशभक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला प्रभात बँडच्या सुरेल सजवटीने सुऊवात झाली. त्यानंतर ऊद्रगर्जना, कामयानी, परशुराम, रमणबाग या ढोल ताशा पथकांनी गणेशभक्तांना थिरकारला लावले. कसबा गणपती लोकमान्य टिळक चौकात दुपारी 2.30 वाजता दाखल झाला आणि गणेशभक्तांचे हात जोडले गेले. 3 वाजता गणरायाचे विसर्जन झाले. त्यानंतर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणुकीत सहभागी झाला. न्यू गंधर्व ब्रास बँडची सुरेल सजावट तसेच शिवमुद्रा आणि ताल या ढोल-ताशा पथकांनी आसमंत दणाणून गेला. टिळक चौकात 2.52 वाजता गणपती दाखल झाला. त्यानंतर 3.15 वाजता या गणपतीचे विसर्जन झाले.
यानंतर मानाचा तिसरा गणपती आणि पुण्याचा राजा गुऊजी तालीम गणपती शिव पार्वती रथातून मिरवणुकीत दाखल झाला. या वेळी नगरकर यांच्या सनई चौघड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. शिवमुद्रा आणि नादब्रह्म या ढोल-ताशा पथकांनी नेत्रदीपक स्थिरवादन केले. या वेळी गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. टिळक चौकात 3.47 वाजता दाखल झाला. 4 वाजता गणपतीचे विसर्जन झाले. यानंतर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती फुलांनी सजवलेल्या मयूर रथातून मिरवणुकीत सहभागी झाला. स्वऊपवर्धिनी आणि गजलक्ष्मी या ढोल-ताशा पथकांनी गणेशभक्तांची मने जिंकली. टिळक चौकात 4.31 वाजता गणपती दाखल झाला. पाच वाजता विसर्जन करण्यात आले. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा चांदीच्या पालखीतून मिरवणुकीत सहभागी झाला. श्रीराम, शिवमुद्रा, स्वराज्य ढोल-ताशा पथकांनी गणेशभक्तांना आपल्या ठेक्यावर ताल धरायला लावला. साडेपाच वाजता गणपतीचे टिळक चौकात आगमन झाले. पावणे सहापर्यंत गणरायाचे विसर्जन झाले.
अंतर पडल्याने काहीसा विलंब
मानाच्या पाच गणपतींचे दरवर्षीपेक्षा तीस तास आधी विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले. मानाचा पहिला कसबा गणपती टिळक चौकात अडीच वाजता आला. त्यानंतर लगोलग मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वर गणपती दाखल झाला. मात्र, त्यानंतर मात्र अंतर पडले. गुऊजी तालीम गणपती तासाभराने दाखल झाला. मागोमाग अर्ध्या तासात म्हणजे साडेचारला तुळशीबाग गणपतीचे आगमन झाले. त्यानंतर पुन्हा एक तासाचे अंतर पडले. केसरीवाड्याचा गणपती येईपर्यंत साडेपाच वाजले. अंतर पडल्याने मिरवणुकीला काहीसा विलंब झाला. तरीही दीड ते दोन तास आधीच मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक संपली.
मिरवणुकीत सळसळता उत्साह
ढोल-ताशांचा गजर, बँड पथकांचे उत्कृष्ट वादन, विशेष व्यक्तींच्या पथकांचे सुरेल वादन, देखाव्यांमधून इतिहासावर टाकलेला दृष्टिक्षेप आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह मिरवणुकीत पाहायला मिळाला. मिरवणूक मार्गावरील राष्ट्रीय कला अकादमीच्या रंगावलीकारांनी काढलेल्या रांगोळ्यांच्या पायघड्या लक्षवेधी ठरल्या. दुपारच्या सुमारास पावसाच्या सरींनी हजेरी लावली. ढोल-ताशा व बँड पथकांच्या वादनाबरोबरच मल्लखांब तसेच इतर चित्तथरारक कसरतींनी सर्वांना श्वास रोखायला लावला.
रांगोळीतून कचऱ्याच्या व्यवस्थापनेचा संदेश
राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने बेलबाग चौक ते टिळक चौक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यामधून कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, असा सामाजिक संदेश देण्यात आला होता. यामध्ये साधारणपणे 600 कलाकार सहभागी झाले होते.








