‘पणजीच्या राजा’ला पोलिसांकडून सशस्त्र मानवंदना
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील 11 दिवशीय गणरायांचे काल अनंतचतुर्दशीदिनी वाजत, गाजत मोठ्या उत्साहात मिरवणुका आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन करण्यात आले. यापैकी बहुतेक गणपती हे सार्वजनिक मंडळांचे होते.
राजधानी पणजीतही तीन ठिकाणी 11 दिवशीय सार्वजनिक गणेशांचे विसर्जन करण्यात आले. त्यात पणजीचा राजा अशी ख्याती असलेल्या चर्च चौकातील गणेशाची सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान उत्तरपूजा, गाऱ्हाणे आदी विधी झाल्यानंतर 5 वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यावेळी पणजी पोलिसांनी सशस्त्र मानवंदना दिली. त्यानंतर परिसरातील प्रोग्रेस विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर मिरवणुकीत सहभाग घेतला. ही मिरवणूक शहरात फिरून मार्केट परिसरमार्गे मांडवी किनारी पोहोचली. तेथून बेती धक्क्यावरून फेरीबोटीतून मूर्ती नदीपात्रात मध्यभागात नेऊन विसर्जित करण्यात आली.
मळा राजाला निरोप
मळा येथील माऊतीगड सार्वजनिक मंडळाच्या ‘मळा राजा’ गणेशाचेही अशाचप्रकारे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान मंदिरापासून नदीकिनारी पोहोचेपर्यंतच्या वाटेत मळा भागात भाविकांनी आपापल्या दारात आरती ओवाळून श्रींचे स्वागत केले. या गणरायाचेही बेती फेरीबोटीतून मांडवीत विसर्जन करण्यात आले.
पोलिस दलाच्या मिरवणुकीत दिंडीचे आकर्षण
आल्तीनो पणजीतील गोवा राखीव पोलिस दलाच्या सार्वजनिक गणरायाचे भक्तिगीतांच्या तालावर मिरवणुकीने नाचत गाजत मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. सायंकाळी 4.30 च्या दरम्यान या मिरवणुकीस प्रारंभ झाला. तेथून दूरदर्शन, धेंपो हाऊस, आकाशवाणीमार्गे चर्च चौकात दाखल होत पुढे मनपाला वळसा घेऊन थेट आझाद मैदान, पोलिस मुख्यालय, मिनेझीस ब्रागांझा सभागृहा समोरून बेती फेरीबोटी धक्क्यासमोर दाखल झाली. त्यानंतर फेरीबोटीतून मांडवीपात्रात नेऊन ‘मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.









