पणजी : राज्यात दीड दिवसाच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावाने निरोप देण्यात आला. ऐन चतुर्थी काळातच पावसाने कहर माजविल्यामुळे भक्तांच्या आनंदावर विरजण पडले. त्यामुळे गुऊवारी सायंकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्याचे पाहून दिवस मावळतीला जाण्यापूर्वीच भक्तांनी सांगणे, गाऱ्हाणे घालून श्रीगणेशाची उत्तरपूजा आटोपली. त्यानंतर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नदीकिनारी नेण्यात आल्या. तेथे शास्त्रोक्त पूजाविधी आटोपल्यानंतर श्रीला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. राजधानी पणजीतील नागरिकांनी सायंकाळी मिरामार समुद्रकिनारी श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन केले. राज्यातील अन्य भागातही लोकांनी पावसाचा अंदाज आणि ओसर पडल्याची संधी घेत नदी, नाले, ओढ्यात मूर्तीचे विसर्जन केले.
पावसामुळे बहुतेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने रात्रीच्या अंधारात विसर्जनासाठी नदीकिनारी जाणे धोक्याचे होते. त्यामुळे बहुतेक भक्तांनी दिवस मावळतीला जाण्यापूर्वीच लगबग करत विसर्जन केले. यंदा पावसामुळे दाऊकामाची आतषबाजी वगैरे करण्यास म्हणावा तसा वाव मिळाला नाही. त्यामुळे अतिउत्साही भक्तांवर हिरमुसले होण्याची वेळ आली. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुका, त्यात वाजणारे डीजे, महिलांच्या फुगड्या, घुमट आरती, आदी प्रकारही पाहण्यात आले नाहीत. उलटपक्षी अनेक भक्तांनी स्वत:च्या वाहनात मूर्ती ठेऊन एकदाचा नदीतीर गाठला आणि गणरायाला निरोप दिला. यानंतर आता रविवार दि. 31 रोजी पाच दिवशीय गणरायाला भक्तगणांकडून निरोप देण्यात येणार आहे. त्यापुढे सात, नऊ आणि 11 दिवशीय गणपतींचे विसर्जन होणार आहे.
सार्वजनिक गणेशमंडळे धास्तावली
दरम्यान, यंदा पावसामुळे सार्वजनिक गणेशपूजनावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही. भरीस हवामान खात्याने दि. 3 सप्टेंबरपर्यंत पाऊस चालूच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे सार्वजनिक मंडळे धास्तावली आहेत. अनेकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्यासाठी प्रसिद्ध तथा महागड्या कलाकारांना आगावू निमंत्रित केले आहेत. पाऊस चालूच राहिल्यास लोक घराबाहेर पडणार नाहीत आणि प्रेक्षक नसेल तर कार्यक्रम रंगणार नाहीत याची धास्ती आयोजकांनी घेतली आहे.









