गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले
मुंबई
“गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!“ या जयघोषात मुंबईत बाप्पांना निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले. मुंबईत सकाळपासूनच अनंतचतुर्दशीनिमित्त घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांच्या विसर्जनाला जल्लोषात सुरुवात झाली. मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेश गल्लीचा राजा सकाळी आठ वाजता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला,तर लालबागच्या राजाची साडेदहा वाजता उत्तरपूजा झाली. त्यानंतर लालबागच्या राजाचा शाही विसर्जन सोहळा सुरु झाला आहे. भक्तांची मोठ्या संख्येनं गर्दी दिसत आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साह दिसत आहे.
मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ
विसर्जनासाठी मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेची जय्यत तयारी केली असून, कडक बंदोबस्त ठेवला आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षाने देखील आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणरायाला निरोप देण्यासाठी तसेच गणेश मंडळाच्या स्वागतासाठी राजकीय पक्षाने जोरदार तयारी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे विसर्जन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरील बाप्पाचा विसर्जन सोहळाही पार पडला. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते बाप्पाचं विसर्जन पार पडलं. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या‘ असं म्हणत बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.
विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट
एकीकडे ढोल-ताशांचा गजर तर दुसरीकडे बाप्पाच्या भक्तांच्या डोळ्यात आसवं दिसत आहे.अशा भावनिक वातावरणात गणपती बाप्पाच्या निरोप मिवरणुकीला पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान आजही हवामान खात्याने मुंबईत पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.









