भक्ती म्हणजे भगवंताच्या आणि त्यांच्या शुद्ध भक्तांच्या प्रसन्नतेकरिता कोणताही भौतिक हेतू न ठेवता निरंतर केलेली सेवा होय. येथे भक्त शुद्ध अंत:करणाने आणि प्रेमाने भगवंताच्या सेवेसाठी आपले तन, मन आणि धन समर्पित करतो. भक्त धूप, दीप, गंध, पुष्प, वस्त्र, नैवेद्य इत्यादी पवित्र वस्तूंद्वारे भगवंताची आराधना करण्यात आनंद घेतो. भगवंत ही एक दिव्य व्यक्ती असल्याने त्यांच्यादेखील विशिष्ट आवडीनिवडी आहेत. भगवंताना प्रेमपूर्वक भावनेने त्यांना आवडत असलेल्या योग्य वस्तू अर्पण करून त्यांना संतुष्ट करता येते आणि यामध्येच भक्तांनाही परमानंद प्राप्त होतो.
भगवंताची मूर्तीही आपल्या मनाप्रमाणे न बनवता शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बनविली जाते. श्रीगणेशाचे रूप आणि स्वरूपाचे वर्णन याबद्दल तंत्र संग्रह (अध्याय 4, श्लोक क्र 91) ग्रंथामध्ये माहिती आढळते, महादरो गजमुख: पाशदंताकुशभ्ये । बिभ्रयेयो विघ्नहर: कामदस्तवरया ह्यायं ।। अर्थात ‘गणपती हे लंबोदर असून त्यांना गजमुख आहे. त्यांच्या तीन हातात अंकुश, दात, आकड्यासारखा कोयता असून चौथा हात अभयमुद्रेमध्ये स्थित आहे. अशा या गणेशाचे विघ्नहर्ता आणि कामनापूर्ती करणारा म्हणून ध्यान करावे’ या ग्रंथात असाही उल्लेख आहे, रक्तांबरो रक्ततनु रक्तमाल्या नुलेपन: । अर्थात ‘गणपती रक्तवर्णाचे वस्त्र परिधान करतात, त्यांचा सुंदर देह लालसर रंगाचा आहे, तो लाल रंगाच्या फुलांची पुष्पमाला परिधान करतो आणि संपूर्ण शरीर कुंकुममिश्रित चंदनाद्वारे लेपीत आहे.’ गणेशाच्या रूपाचे आणि त्याच्या हातातील वस्तूंचे हे शास्त्राsक्त वर्णन आहे. त्यामुळे गणेशाची मूर्तीही अशा शास्त्र निर्देशानुसारच बनविली पाहिजे. स्वत:ची कल्पकता आणि कला प्रदर्शित करण्यासाठी मूर्तिकारांनी केवळ प्रसिद्धीकरिता व काहीतरी नाविन्यपूर्ण केले यांचे प्रदर्शन करण्यासाठी शास्त्राsक्त मूर्ती बनविण्याच्या प्रक्रियेत बदल करू नयेत. दुर्दैवाने आजकाल गणेशाला एखाद्या प्रसिद्ध खेळाडूच्या रूपात, राजकारण्यांच्या रूपात, सिनेनट अथवा स्वत:च्या आवडत्या व्यक्तीच्या रूपात प्रदर्शित केले जाते.
मूर्ती हे भगवंतांचे प्रातिनिधिक स्वरूप आहे ज्या माध्यमाने भगवंत आपल्या भक्तांची प्रेममयी सेवा स्वीकार करतात. यासाठी मूर्ती आणि प्रत्यक्ष भगवंत यामध्ये कोणताही भेद अथवा फरक नाही. हे ज्ञान आपल्या भौतिक इंद्रियाने समजत नाही तर यासाठी शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या दृष्टीतून मूर्तीकडे पहायला शिकले पाहिजे. यासाठी मूर्ती बनवण्यासाठीही शास्त्रांमध्ये काही निर्देश दिलेले आहेत. शिवपुराण अंतर्गत ऊद्रसंहिता अध्याय 18, श्लोक 42-43 मध्ये भगवान शिव सांगतात की गणेशाची मूर्ती ही धातू, पाचू, पांढरे अर्कफुल अथवा मातीपासून बनवावी. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णही आपला भक्त उद्धवाला मूर्ती कशापासून बनवावी याबद्दल वर्णन करतात.(भा 11,27,12) शैली दाऊमयी लौही लेप्या लेख्या च सैकती । मनोमयी मणिमयी प्रतिमाष्टविधा स्मृता । अर्थात ‘भगवंताची मूर्ती पाषाण, काष्ठ, धातू, माती, वाळू, चित्र, रत्न आणि मन या आठ तत्त्वांमध्ये प्रकट होते.’ यासाठी बहुतेक ठिकाणी गणपतीच्या उत्सवासाठी पारंपरिक पद्धतीने मातीपासून आणि नैसर्गिक रंगापासून मूर्ती बनविल्या जातात. अशी शास्त्रानुसार बनविलेली मूर्ती पर्यावरणाला कधीच हानिकारक नसते. अशा गणेशमूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन केल्यावर मातीची बनविलेली असल्याने ती त्वरित विरघळून जाते आणि त्यांचा रंग नैसर्गिक असल्याने पाण्यात विषारी रसायने मिसळत नाहीत. परंतु आजकाल कलियुगाच्या प्रभावाने याला बाजारी स्वरूप आल्याने केवळ पैसे कमवण्यासाठी गणेशाच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविल्या जातात आणि त्यावर घातक रसायनांपासून बनविलेला रंग चढविला जातो. अशा मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाहीत आणि विषारी रंग तसेच पाण्यावर तरंगत राहतात आणि यामुळे पर्यावरण आणि पाणी प्रदूषित होते. शास्त्रशुद्ध मार्गाने बनविलेली आणि पारंपरिकरित्या पिढ्या न् पिढ्या चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे बनविलेली मूर्ती गणेशोत्सवात वापरणे योग्य ठरते. गणेशाची पूजा कशी करावी याबद्दलही शास्त्र वर्णन करते. ऊद्रसंहिता, शिवपुराणामध्ये गणेश पूजेविषयी सांगितले आहे की गणेशाच्या मूर्तीची गंध, पुष्प, चंदन-लेपासह शुद्ध अंत:करणाने सेवा केली जावी. रात्रीच्या पहिल्या प्रहरीनंतर स्वच्छ आंघोळ करून गणेशाची पूजा करावी. त्यांना धूप, दीप आणि सुंदर व्यंजने अर्पण करून योग्य प्रार्थनेद्वारे त्यांची आराधना करावी. हे सर्व भक्तिभावाने केले पाहिजे. आजकाल विशेषत: सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये होणारी पूजा ही रात्रभर चालणाऱ्या एखाद्या संगीत रजनीप्रमाणे प्रतीत होते. ध्वनिक्षेपकांवर मोठमोठ्याने वाजविली जाणारी फिल्मी गाणी, गणपतीच्या मंडपात बसून मूर्तीसमोर पत्ते, पॅरम खेळत बसणे अशा गोष्टी गणेशोत्सवाच्या नावाने घडत आहेत. या सर्वांचा गणपती उत्सवाशी दुरान्वयेही संबंध नाही व अशा स्वैर वागण्याने नक्कीच गणपती प्रसन्न होणार नाहीत.
गणपती हे दैवत सर्वानाच अतिशय प्रिय आहे, कारण विघ्नहर्ता असल्याने लहानापासून ते थोरांपर्यंत सर्वांची विघ्ने हरण करून त्यांना आध्यात्मिक जीवनात मदत करतात. गणेश हे त्यांचे पिता भगवान शंकरांप्रमाणेच श्रीविष्णुंचे शुद्ध भक्त आहेत. एक वैष्णव या नात्याने त्यांना दुसऱ्यांचे दु:ख सहन होत नाही. यासाठी वैष्णवांच्या आध्यात्मिक मार्गात येणारी सर्व विघ्ने दूर करण्याची सेवा स्वखुशीने ते स्वीकारतात. याचे वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये केले आहे. यत्-पाद-पल्लव-युगम् विनिधाय कुंभ-द्वंद्वे प्रणाम-समये स गणधिराज: विघ्न विहंतुम अलं अस्य जगत-त्रयस्य गोविंदम् आदि-पुऊषम् तम अहं भजामि श्रीगणेशांनी भक्तीतील सर्व विघ्नांचा नाश करणाऱ्या भगवान श्रीगोविंदांचे चरणकमल आपल्या मस्तकावर धारण केल्याने त्यांनाही विघ्ने दूर करण्याचे आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त झाले आहे. याचबरोबर कलियुगामध्ये जन्माला आलेल्या आपल्यासारख्या अल्पायुषी, मंदबुद्धी, आळशी आणि दुर्दैवी जीवांसाठी आणखी एक वरदान दिले आहे. या युगाच्या प्रारंभी जेव्हा सर्व वेद, उपनिषदे, इतिहास पुराणे इत्यादी सर्व जीवांसाठी लिखित स्वरूपात प्रस्तुत करण्याची वेदव्यासांची तीव्र इच्छा होती, परंतु या सेवेसाठी न थकता आणि न चुकता अव्याहतपणे अतिवेगाने लिखाण करणारी एक व्यक्ती हवी होती. ही वार्ता समजताच गणेशांनी ही जबाबदारी पार पाडण्याचे ठरविले. त्यांच्या या सेवेमुळे आज आपण कलह आणि दंभयुक्त अशा घोर कलियुगातदेखील भगवान श्रीकृष्णाची भक्ती करू शकतो. यासाठी प्रामाणिक आध्यात्मिक साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी महाभारत, गीता-भागवत इत्यादी ग्रंथांची रचना व्यासदेवांच्या मार्गदर्शनाखाली गणेशांनी केली. यासाठी सर्वजण विशेषत: वैष्णव सर्व कार्याच्या आरंभी गणेशाची स्तुती आपल्या जीवनातील आध्यात्मिक विघ्ने दूर व्हावीत म्हणून करतात.
संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. देहूजवळच असलेल्या चिंचवड येथे चिंतामणी देव नावाचे गणपती भक्त त्याकाळी होते. त्यांनी तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी बोलावणे पाठविले. महाराजांची परीक्षा घेण्याची चिंतामणी देवांची मनीषा होती. तुकाराम महाराजांच्याबरोबर पांडुरंग जेवण करतो असे त्यांनी ऐकले होते. भोजनाची तयारी झाली त्यावेळी तुकारामांनी देवांना आणखी दोन पाने मांडण्यास सांगितले. एक गणपतीसाठी आणि दुसरे पांडुरंगासाठी. याप्रसंगी तुकारामांनी चिंतामणीदेवांना गणपती आणि पांडुरंगाना बोलावण्यास सांगितले. त्यावर चिंतामणी देव म्हणाले ‘आम्ही ज्ञानाच्या अभिमानाने नागवले गेलेलो आहोत, आमचे कुठे आहे एवढे सामर्थ्य? तुम्हीच गणपतीस आणि तुमच्या पांडुरंगाला बोलवा ना!’ यावर तुकाराम महाराज नम्रतेने म्हणाले ‘तुमच्या पुण्याईच्या प्रभावाने मी गणपतीस त्वरित बोलवितो.’ तुकाराम महाराजांनी मनोमन प्रार्थना केली आणि हे दोन्ही देव प्रत्यक्ष अवतरले. त्यानंतर सर्वानी मिळून भोजन केले. या प्रसंगाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, चिंतामणी देवा गणपतीस आणा। करवावें भोजन दुजे पात्री।।1।। देव म्हणती तुक्मया एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागविलों ।।2।। वाडवेळ जाला सीळे जालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती।।3।। तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते । आणीन त्वरित मोरयासी।।4।। अशा प्रकारे चिंतामणी देवांना असलेल्या अभिमानाचे विघ्न तुकारामांनी गणपतीच्या साक्षीने दूर केले.
-वृंदावनदास








