अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, मी सांगितलेले ब्रह्मज्ञान जो माझ्या भक्तांना देईल तो माझा अत्यंत आवडता होईल. हे ब्रह्मज्ञान तो त्याच्या शिष्यांना देत असताना मीच त्याचे शरीर होऊन त्याच्या मुखातून बोलत असतो. ज्याप्रमाणे मी अवतार घेतला आहे त्याप्रमाणे तोही अवतारी पुरुष होतो. आम्ही इतके एकरूप होतो की, त्याच्यात आणि माझ्यात तिळभरसुद्धा फरक रहात नाही. त्याच्या जड देहाने जे जे कृत्य करणे अपेक्षित आहे ते ते सर्व मी शिरावर घेतो आणि पार पाडतो. त्याबदल्यात माझी सर्व चैतन्यसाम्राज्यरुपी संपत्ती त्याला अर्पण करतो. असं जरी असलं तरी मी म्हणतो तसे सर्व भुते हे माझेच स्वरूप आहेत हे लक्षात घेऊन माझी चौथी भक्ती करणे ज्यांना शक्य होत नाही त्यांनी ह्या ग्रंथाचे पठण मन लावून करावे. असे केल्याने ते परम पावन होतील. अत्यंत श्रद्धेने श्रवण केल्यावर ऐकलेल्या ज्ञानाचे दृढ मनन करून ते चित्तात साठवून ठेवावे म्हणजे ते कृतीत उतरेल कारण नुसते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले तर ते वाया जाते. त्यामुळे ब्रह्मप्राप्ती होत नाही. लोभ्याच्या मनात जसे अधिकाधिक धन कसे मिळवता येईल ह्याबद्दल सतत विचार येत असतात त्याप्रमाणे कथा ऐकून झाल्यावर आपले कल्याण साधण्यासाठी त्यातील मुद्दे मनात सतत घोळवत रहावे. हे लक्षात ठेवले की, जसजसे श्रवण होत जाईल तसतसे त्यावर सतत मनन होत राहील. ह्यालाच पराभक्ती असे म्हणतात. आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी ही भक्तांची विभागणी तुझ्या परिचयाची आहेच. हे तिन्ही प्रकार सोडून, एकादश स्कंधाचे श्रवण करून, भक्ती करणारे माझी चौथी भक्ती करू लागतात. तिला पराभक्ती असे म्हणतात. जे माझी चौथी भक्ती करतात त्यांना त्यामुळे माझे आत्मदर्शन होते. अशा माझ्या भक्तांना कर्मबंधन बाधू शकत नाही. निखळ ब्रह्मज्ञानाची चर्चा असलेला हा तुझा माझा संवाद जो सावध, श्रद्धाळू साधक आदराने वाचेल तो चढत्या वाढत्या श्रेणीने शुद्ध सात्विक होत जाईल. सततच्या वाचनातून ह्या संवादाची अद्भुतता जाणवून त्याला त्याची नित्यनवी गोडी लागेल. जे पठण करू शकणार नाहीत त्यांनी श्रद्धेने श्रवण करावे म्हणजे त्यांना भवबंधन लागू होणार नाही. उद्धवा हे अत्यंत गुह्य बोलणे असून जे एकादश स्कंधाचे श्रवण करतील त्यांनी मी त्यांचा नक्की उद्धार करिन हा विश्वास मनी बाळगावा. मी सांगतो त्याप्रमाणे श्रवणाविषयी जो दृढ विश्वास बाळगेल त्याची माझ्यावर निरपेक्ष भक्ती जडून तो निष्काम होईल. त्याच्या सर्व कर्मातून पाप, पुण्याच्या तयार होणाऱ्या फलाचा नाश होईल. उद्धवा, माझी निष्काम भक्ती करणे हीच पराभक्ती होय. श्रवण करणाऱ्याचे हेच परमधाम होय. परमधामी पोहोचल्यामुळे त्याचे जन्ममरणाचे चक्र थांबते. ग्रंथ पठण केल्याने माझ्या ज्ञानाचा दिवा पूर्ण प्रकाशित होऊन पठण करणाऱ्यांना माझ्या पूर्ण स्वरूपाचे दर्शन होईल. पठण, श्रवण करणाऱ्याचे तर भले होईलच पण त्याच्या संगतीत जे राहतील, त्यांच्यामुळे स्वर्ग, मृत्यू पाताळ हे तिन्ही लोक पावन होतील. त्यांना ब्रह्मादिकसुद्धा वंदन करतील. म्हणून सांगतो की, एकादश स्कंधाचे श्रद्धेने पठण, श्रवण केले असता भक्तजन मुक्त होतात. हे ब्रह्मज्ञान आवडीने पठण करतील, श्रवण करतील, ग्रहण करतील आणि त्याप्रमाणे वागतील त्यांचे कोटकल्याण कसे होईल हे सांगून झाल्यावर भगवंत आता हे ज्ञान इतरांना सांगणारे कसे धन्य होतात ते सांगत आहेत. ते म्हणाले, जो हे ब्रह्मज्ञान इतरांना सांगतो, तो स्वत:च्या जीभेच्या वाती करून, त्याने ज्ञानज्योत प्रकाशित करत असल्याने, त्याला माझ्यावरील श्रद्धेची आणि माझ्याबद्दलच्या स्नेहाची संपत्ती लाभेल. एकादश इंद्रियांच्या वातीने, ह्या एकादश स्कंधाच्या ज्ञानज्योती उजळून जो मला ओवाळेल तो किती पवित्र होईल हे मी सांगू शकत नाही.
क्रमश:








