अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले उद्धवा, देशकालानुरूप जे कुलाचार प्राप्त झालेले आहेत ते आणि वेदांनी सांगितलेल्या नित्यनैमत्तिक कामांना कर्मे असे म्हणतात. माझ्या प्राप्तीच्या उद्देशाने जे कर्म केले जाते त्याला साधारण-मदर्थ कर्म असे म्हणतात. सगळ्या कर्मांचा मीच कर्ता असून कर्मसिद्धीही मीच साधून देतो. एव्हढेच नव्हे तर कर्मफलाचा मीच भोक्ता आहे. ह्यालाच कर्म कृष्णार्पण करणे असे म्हणतात. माणसाच्या मनाला विषयांबद्दल अत्यंत प्रीती असते त्यामुळे त्याचे मन कर्माचे कर्तृत्व आणि भोत्तृत्व माझ्याकडे आहे हे सहजासहजी मानायला तयार होत नाही. जर त्याने हळूहळू माझे अनुसंधान राखायला सुरवात केली आणि नंतर ते त्याच्याकडून अखंड होऊ लागले तर मात्र त्याचे मन माझ्या स्वरुपात रममाण होते.
सुरवातीला माझे अनुसंधान करणे माणसाच्या मनाला फारसे पसंत नसल्याने त्याला त्याची बिलकुलच आवड नसते. तरीही ज्याला ब्रह्मप्राप्ती व्हावी असे वाटते त्याने जमेल तसे माझे स्मरण करत रहावे म्हणजे मनाला त्याची सवय होते आणि मग माझ्या भजनाची त्याला गोडी लागते. असं जरी असलं तरी माणसाची बुद्धी त्याला दगा देत असते. माणसाच्या बुद्धीला देहाचा फार अहंकार असल्याने देहसुख हेच परमोच्च सुख आहे अशी त्याला खात्री वाटत असते. इथपासून सुरवात करून माझ्या स्वरुपाशिवाय इतर कशाचे अस्तित्व मानायला मन तयार होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की मग तेच मन माझ्याठिकाणी ज्या पद्धतीने जडते त्याला मर्दपण असे म्हणतात. असे माझ्या रुपात निमग्न झालेल्या मनाला माझ्या भजनाची अत्यंत गोडी लागते मग तो माझा भक्त परमपावन होतो. आपल्या देशात अनेक परमपवित्र तीर्थक्षेत्रे आहेत यादी करायचीच झाली तर चांगलीच लांबलचक होईल तरीपण त्यातील मुख्य सांगतो. पावन कुरुक्षेत्र, अतिपवित्र अयोध्या, गंगायमुना ह्या दोन्हींचे डावेउजवे तीर, अपार पवित्र अबूचा पर्वत, नंदिग्राम, पावन बदरिकाश्रम पंचवटीतील श्रीरामाश्रम, परम पावन गौतमीतट श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले दण्डकारण्य, मथुरा, गोकुळ, वृंदावन, परम पावन ब्रह्मगिरी, श्रीविठ्ठलाच्या वास्तव्याने पवित्र झालेली दक्षिणद्वारावती पंढरी, सर्व पापांचे निर्दालन करणारी काशी, साधकांना अतिशय सहाय्यभूत होणारी पुण्यप्रद वाराणसी, गंगा, यमुना, सरस्वती, साबरमती, वैतरणी, गंडकी, नर्मदा, तापी, गोदावरी, चंद्रभागा, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, गोमती, पावन क्षिती श्रीशैल, कावेरीचे उभय तीर, पवित्र क्षेत्र चिदंबर, कृतमाला पयस्विनी, अतिपवित्र ताम्रपर्णी, पवित्र क्षेत्र नैमिषारण्य अशी अनेक पवित्र ठिकाणे आहेत. तेथे अनेक सज्जन भक्त राहतात. त्यामुळे हा देश सर्वार्थाने पावन झालेला आहे.
ज्या गावात माझे भक्त राहतात तो गाव अत्यंत पवित्र होतो तर ज्या देशात साधुसंत राहतात तो देश ते पवित्र करतात. ज्या ठिकाणाला भक्तांचा वारा लागतो ते ठिकाण अतिपवित्र होते. त्यांची सत्संगती ज्यांना लाभते तेही पवित्र होतात. ज्याप्रमाणे चंदनाच्या सुवासाने आजूबाजूच्या बोरीबाभळी सुवासिक होतात त्याप्रमाणे ज्यांना देव आणि ब्राह्मण वंदन करतात त्या संतांची जे संगत करतात तेही धन्य होतात.
ज्याचा भाग्योदय झालेला असेल त्यालाच सत्संगती लाभते आणि ती लाभलेले साधक निश्चितच पावन होतात. माझ्या स्वरूपावर ज्यांचे चित्त अखंड केलेल्या माझ्या भजनामुळे सतत जडलेले असते त्यांनाच मद्भक्त म्हणतात. तेच खरे संतसज्जन होत. माझ्या भक्तांच्या आचरणाला देव, मनुष्य आणि राक्षस सर्वच वंदन करतात. म्हणून साधकाने निश्चतपणे त्यांचे अनुकरण करावे. ज्याप्रमाणे नारद, प्रल्हाद, अंबरीष असे श्रेष्ठ भक्त रात्रंदिवस माझ्या भक्तीत रममाण होतात त्याप्रमाणे साधकानेही माझ्या भक्तीत तल्लीन व्हावे. भक्ताने वार्षिकी यात्रा पर्वपूजा, अधोक्षजाला अर्पण करावीत. छत्रचामरादि गोष्टी, गरुडध्वजांकित चिन्हे इत्यादि राजेमहाराजांना शोभणाऱ्या गोष्टी श्रद्धेने देवाला अर्पण कराव्यात.
क्रमश:








