वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना घ्यावे लागले परिश्रम
वार्ताहर /सांबरा
बसरीकट्टी (ता बेळगाव ) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवार दि. 13 पासून प्रारंभ झाला असून, देवीच्या दर्शनासाठी गुरुवारीही असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे गावातील सर्व परिसर भाविकांनी फुलून गेला होता . गुरुवार दि. 15 रोजी प्रत्येकांच्या घरी स्नेहभोजनाचा बेत असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिंदोळी क्रॉस ते बसरीकट्टी दरम्यानच्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. गावामध्ये गर्दी होऊ नये यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची गावच्या बाहेरच पार्किंगची सोय करण्यात आली होती. तर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने दर्शनासाठी भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत गावामध्ये भाविकांची मोठी गर्दी होती. जितके भाविक जात होते तितकेच भाविक गावामध्ये येतानाचे चित्र पहावयास मिळाले. भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत सदस्य परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विक्रम देसाईसह बसवानी कोंडसकोप, कुशाप्पा खन्नूकर, संजीव देसाई, सिद्राई नागरोळी, सुधीर देसाई, यल्लाप्पा चौगुले, सोमनाथ कुरंगी आदी यावेळी उपस्थित होते.









