चैत्र पौर्णिमेसाठी परंपरा जोपासत बैलगाड्यांसह प्रस्थान
बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी (कोल्हापूर) येथील चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रेसाठी गुरुवारी नार्वेकर गल्ली येथून भक्त रवाना झाले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने पायी पालखी आणि बैलगाडीने प्रस्थान केले. गुरुवारी सायंकाळी ढोल व वाद्यांच्या गजरात पालखीचे पूजन करण्यात आले. मागील 59 वर्षांपासून ही परंपरा अखंडित सुरू आहे. कोल्हापूर येथील जोतिबा मंदिरात 11 व 12 रोजी चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव होणार आहे. या यात्रेसाठी बेळगाव येथील गणेबैल, नार्वेकर गल्ली शहापूर, नार्वेकर गल्ली बेळगाव, चव्हाट गल्ली, ताशिलदार गल्ली, हलकर्णी-खानापूर, बसवण कुडची, हलगा यांसह 16 बैलगाड्या रवाना झाल्या आहेत. यामध्ये 200 हून अधिक भक्तांचा सहभाग आहे. होनगा, हेब्बाळ, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर या ठिकाणी वसती करून भक्त डोंगरावर दाखल होणार आहेत.









