वाहतूक पोलीस मडगावातील बाजार परिसरांत राहून ‘चलन’ जारी करत असल्याने नागरिकांकडून संताप
मडगाव : गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी लोक मडगावातील मुख्य बाजारपेठ असलेल्या न्यू मार्केट तसेच गांधी मार्केटमध्ये गर्दी करू लागलेले आहेत. अशा परिस्थितीत सणासुदीची खरेदी असल्याने धावपळीत बाजारहाट करून जाताना एखादेवेळी हेल्मेट परिधान करण्याचा विसर पडल्यास भर बाजारात टपून बसलेले वाहतूक पोलीस लोकांना पकडून दंड ठोठावत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गांधी मार्केटमध्ये प्रवेशाच्या रस्त्यांवर तसेच बॉम्बे कॅफेजवळ वाहतूक पोलीस लोकांना पकडून चलन देत असल्याचे आढळून येत आहे. ‘सणासुदीची खरेदी असल्याने खरेदीच्या यादीतील काही वस्तू घेण्यास विसरलेलो तर नाही ना हे पाहण्यात मी व्यस्त होतो. हेल्मेट जवळ होते, पण ते परिधान करण्यास विसरलो. बाजार परिसरात बॉम्बे कॅफेजवळ मला अडविले गेले. मी सणासाठी खरेदीला आलेलो असून त्या भरात हेल्मेट घालण्यास विसरलो, आता घालतो असे सांगून हेल्मेट घातले, तरी दंड ठोठावल्याशिवाय मला सोडले गेले नाही’, अशी कैफियत एका दुचाकीचालकाने या प्रतिनिधीशी बोलताना मांडली.
सणासुदीत महागाईने कळस घातला आहे. त्यातच प्रिय बाप्पाच्या चतुर्थीवेळी आम्ही हात मागे न घेता चांगल्या प्रकारे सण साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. भर बाजारात वाहनांच्या वर्दळीमुळे एकदम धिम्या गतीने वाहने हाकावी लागतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या खरेदीच्या गडबडीत हेल्मेट घालण्यास विसरलेल्या दुचाकीस्वारांना पकडून त्यांना चलन देण्यात येत असल्याबद्दल अन्य एका दुचाकीस्वाराने संताप व्यक्त केला. आधीच चतुर्थीचा खर्च भागविताना नाकीनऊ येत आहे. अशा वेळी हजारभर ऊपयांचा दंड परवडणारा नसून वाहतूक पोलीस कायद्याचा हवाला देत असले, तरी ऐन सणासुदीच्या वेळी भर बाजारात संधी साधून असे चलन देणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आणखी एका दुचाकीस्वाराने व्यक्त केली.
वाहतूक पोलिसांनी गांधी मार्केट आणि न्यू मार्केट या भिडून असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी उभे राहून मोठ्या स्वऊपात दंड ठोठावण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. आधीच ग्राहक कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. सणासुदीच्या काळात भर बाजाराच्या ठिकाणी हे चलन देण्याचे प्रकार न थांबविल्यास आमच्या व्यवसायावर आणखी परिणाम होईल. स्थानिक आमदार तसेच वाहतूकमंत्री व मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लक्ष घालून बाजारपेठेपासून 200 मीटर अंतरात तरी चलन देऊ नये असे निर्देश वाहतूक पोलिसांना द्यावेत, अशी मागणी एका दुकानदाराने केली.









