अध्याय एकोणतिसावा
योगाभ्यास करताना मनाचा निग्रह करावा लागतो पण ते स्वबळावर करू म्हंटले तर शक्य होत नाही हे साधकाच्या लक्षात आल्यावर तो तुला मनापासून शरण जातो. तुला जीवभावाने भजले असता भक्तांना विघ्नांना कधीच तोंड द्यावे लागत नाही. एव्हढेच नव्हे तर तुझ्या कृपेच्या जोरावर भक्तच त्या विघ्नांना पळवून लावतो. त्यामुळे विघ्नांचे भक्ताला त्रास देण्यासाठी त्याच्या मार्गात आडवे यायचे धाडसच होत नाही. त्यामुळे जो भक्त काय वाटेल ते झालं तरी मी तुझी भक्ती करणारच अशा दृढनिश्चयाने संपन्न झालेला असतो, त्याला हात लावायचे धाडस काळालाही होत नाही मग विघ्नांची त्याला त्रास द्यायची काय बिशाद आहे? म्हणून जो मनोभावे तुला सर्व काही विसरून अनन्यशरण येतो, त्याच्यासाठी तुझे चरण हे कामधेनुसारखे सर्व मनोरथ पूर्ण करणारे ठरतात.
निर्मळ अशा भक्तीसरोवरामध्ये नवविधा भक्तीचे जल भरलेले असते. त्यात तुझे चरणकमल विकसित झालेले असते. येथे विवेकी पुरुष तुझ्या चरणकमलांच्या स्पर्शाचा आनंद कसा घेतात हे समजावून सांगण्यासाठी नाथमहाराज एक सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात, सरोवरात उमललेल्या कमळावर भ्रमर स्वानुभवाने हळुवारपणे झेपावतो आणि केसराचे सेवन करून आनंदाचा अनुभव घेतो, त्याप्रमाणे विवेकी परमहंस असलेले अनन्य ज्ञानी भक्त तुझ्या चरणकमळी वास करून परम आनंद मिळवतात. हे झाले निरपेक्ष असलेल्या ज्ञानी भक्तांबाबत परंतु भक्तांच्या इतर तीन प्रकारात मोडणारे आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी भक्तही त्या सरोवरात असतात. त्यांना ते करत असलेल्या तुझ्या भक्तीच्या बदल्यात तू त्यांच्या प्रापंचिक अपेक्षा पूर्ण कराव्यास अशी इच्छा असते.
साहजिकच ते तुझ्या चरण कमलांशी वास केल्यावर मिळणाऱ्या आनंदाला मुकतात. बिचाऱ्यांना निष्काम भक्तीचे रहस्यच माहित नसल्याने त्यांना कमळातील मकरंदाच्या आनंदाची कल्पनाच नसते. ते सरोवरातील कमळाच्या तळाशीच घोटाळत राहतात. ते जरी तुझ्या निष्काम भक्तीबद्दल अज्ञानी असले तरी अशा भोळ्याभाबड्या भक्तांच्याकडे तुझे मात्र पुरेपुर लक्ष असते. त्यांच्या तुझ्यावरील असलेल्या प्रेमाला भुलून तू त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांचाही उद्धार करतोस. तू विश्वमूर्ती विश्वेश्वर असून ब्रह्मादिकांचाही ईश्वर आहेस. त्यामुळे तू अभय दिल्यावर भक्तांना भवाची भीती कधीही स्पर्श करत नाही. त्यांच्या दृष्टीने तुझी भक्ती हेच सत्कर्म असते आणि तुझ्यावर प्रेम करणे हाच त्यांचा स्वधर्म असतो. तुला नैवेद्य अर्पण करणे हाच परम भक्तांचा यज्ञयाग असतो. नित्य तुझी आठवण रहावी म्हणून तुझे नामस्मरण सतत करणे हाच ध्यास त्यांना लागलेला असतो. तुझ्या कीर्तनात रमणे हीच त्यांची परम ते समाधी असते.
एकूण काय तर भक्त जे जे कर्म करतात त्यात तू आहेस अशी त्यांची भावना असते आणि त्यामुळे तू संतुष्ट होतोस. तू संतुष्ट झाल्यामुळे त्यांना हा संसार खरा आहे असा भ्रम होत नाही. ह्याप्रमाणे मुखाने तुझे भजन करत असलेल्या भक्ताला निजात्मसुख देऊन त्याला तू तारतोस. त्यातून त्याला कायम टिकणारे सुख प्राप्त झाल्याने तो हरखून जाऊन अतिसंतोषाने डोलू लागतो. जे तुला शरण येत नाहीत ते मायेने मोहित होतात. जे तुझ्या चरणांकडे पाठ फिरवतात त्यांना स्वप्नातही सुखाचा अनुभव येत नाही उलट त्यांना चढते वाढते दु:खच भोगावे लागते कारण त्यांना माया मूर्ख बनवते. तसेच तुझ्या चरणांचे ध्यान करायचे सोडून जे योगयागक्रिया किंवा दानधर्म करत बसतात त्यांचे मी कर्ता आहे ह्याचे भान कधीच सुटत नसल्याने त्यांनी केलेली पुण्यकर्मे त्यांनाच बंधनकारक होतात. मी हे सगळे माझ्या ज्ञानामुळे करत आहे ह्या कल्पनेने त्यांना अभिमान छळून काढतो. त्यामुळे ते दिवसेंदिवस तुझ्यापासून दूर जातात. त्यांना झालेला ज्ञानाचा अभिमान त्यांचे अभक्तपण प्रकाशित करते.
क्रमश:








