आज जत्रोत्सवाची सांगता : रात्री देवी मंदिरात प्रवेश करणार.
प्रतिनिधी / डिचोली
शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या गेल्या सोम. दि. 24 एप्रिल रोजी झालेल्या जत्रोत्सवानंतर चार दिवस सुरू असलेल्या कौलोत्सवाला भाविक भक्तांचा मोठी गर्दी उसळली आहे. आज शुक्र. दि. 28 रोजी या कौलोत्सवाची आणि पाच दिवसीय जत्रोत्सवाचीही सांगता होणार आहे. देवीचा कौलप्रसाद मिळविण्यासाठी शिरगावात दिवसभर व महिला भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे.
सोमवारी जत्रोत्सव तसेच मंगळवारी पहाटे देवीने अग्निदिव्य मार्गक्रमण केल्यानंतर देवीचा कळस चव्हाटा येथे ठेवण्यात आला होता. संध्याकाळी कळस मानसवाडा शिरगाव येथे नेण्यात आला आणि कौलोत्सवाला प्रारंभ झाला. मानसवाडा येथून गेले तीन दिवस ठरलेल्या प्रमाणे गावातील भाविकांच्या घरांना भेटी दिल्या. या घरांना भेटी दिल्यानंतर देवीचा कळस मोडाच्या डोक्यावर स्वार करून सर्वप्रथम त्या घरातील लोकांना त्यांच्या नातलगांना कौल दिल जातो. आणि त्यानंतर बाहेरून येणाऱ्या भाविकांना देवी कौलप्रसाद देते.
जत्रोत्सवानंतर गेले तीन दिवस बहुतेक घरांना भेटी दिल्यानंतर आज शुक्र. दि. 28 रोजी दिवसभर राहिलेल्या घरांना भेटी देणार आणि रात्री देवीचा कळस विधीवतपणे मंदिरात प्रवेश करणार व या पाच दिवसीय जत्रोत्सव आणि कौलोत्सवाची सांगता होणार आहे. देवीच्या कौलोत्सवासाठी शिरगावात गेले तीनही दिवस भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
गेले तीन दिवस शिरगावात देवीचा कौलप्रसाद व आशिर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती.









