वृत्तसंस्था / देहराडून
बाबा केदारनाथ यांच्या भक्तांना पावसाळ्यातही हेलिकॉप्टरने धाम गाठता येणार आहे. ट्रान्स भारत आणि हिमालयन एव्हिएशन 8 जुलैपासून धाम दर्शनासाठी आपली हेलिकॉप्टर सेवा सुरू करणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तीन हेलिकॉप्टर कंपन्यांनी येथून माघार घेतली आहे. गेल्या आठवडाभरापासून केदारनाथमध्ये सतत पडत असलेला पाऊस आणि गौरीकुंड ते केदारनाथपर्यंत दाट धुक्मयामुळे हेलिकॉप्टर सेवा विस्कळीत होत आहे. हवामान खात्याने 25 जूनपर्यंत पाऊस आणि वादळाचा रेड अलर्टही जारी केला आहे. या अलर्टमुळे काही कंपन्यांनी आपली सेवा तात्पुरती स्थगित ठेवली आहे. मात्र, दोन कंपन्यांनी सेवा सुरू ठेवल्यामुळे दररोज किमान 400 भाविकांना धाम गाठता येणार आहे. यावषी 25 एप्रिलपासून सुरू झालेल्या केदारनाथ यात्रेसाठी ट्रान्स भारत, आर्यन, क्रिस्टल, ग्लोबल विक्ट्रा, थंबी, हिमालयन आणि एरो हेली कंपनीला उत्तराखंड सरकारकडून हेलिकॉप्टर सेवेसाठी परवानगी मिळाली होती.









