वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यास सहभागी झालेल्या भाविकांची संख्या आता 50 कोटीपार झाली आहे. हा आतापर्यंतचा विक्रम मानला जात आहे. 26 फेब्रुवारीला शिवरात्रीच्या दिवशी या महापर्वणीची समाप्ती होणार आहे. आता यासाठी केवळ 12 दिवसच उरल्याने प्रचंड संख्येने भक्तांचे आगमन प्रतिदिन होत आहे. प्रयागराज प्रशासनाने कडेकोड सुरक्षा व्यवस्था ठेवलेली असून पोलीस आणि नागरी अधिकारी प्रत्यक्ष या व्यवस्थेचे क्रियान्वयन करीत आहेत.
यंदाचा महाकुंभमेळा सर्वार्थाने आतापर्यंतचा सर्वात मोठा ठरला आहे. भाविकांची संख्या वाढत असल्याने संगम स्नानासाठी घाटांपर्यंत पोहचण्यास कित्येक तास लागत आहेत. 10 ते 15 किलोमीटरच्या रांगा लागल्या असून शारिरीक त्रास सोसूनही भाविक संगमस्नानाची पर्वणी साधत आहेत. या महाकुंभमेळ्यात आता आणखी दोन शाही स्नाने उरलेली असून त्यांच्या दिवशी प्रत्येकी किमान 1 कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महाशिवरात्रीपर्यंत आणखी किमान 10 कोटी भाविक स्नानपर्वणी साधतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.









