नाईक कुटुंबियांकडून विठ्ठलरुपी गणेश व वाड्यासह विविध संतांचे लक्षवेधी देखावे
सांगे : सांगे तालुक्यातील भाटी, वालशे येथे श्री गणेश चतुर्थीनिमित्त नाईक कुटुंबियांनी यावर्षी श्री विठ्ठलऊपी श्री गणेश व त्यांच्या वाड्याचा सुरेख देखावा तयार केलेला आहे. त्याचबरोबर अंगणात एकाहून एक सरस आणि सुंदर देखावे साकारण्यात आलेले असून ते गणेशभक्तांचे मन प्रसन्न करून सोडतात. नाईक कुटुंबियांकडून सुंदर देखावे साकारण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. आजपर्यंत श्री गणेश चतुर्थीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक, पौराणिक व काल्पनिक देखावे तयार करून वालशे येथील पाच भावंडांनी नाव कमाविले आहे,. चतुर्थी जवळ आली की, दोन महिने आधी घरची मंडळी देखावा तयार करायला सुऊवात करतात. घराच्या अंगणात देखावे व घरात श्री गणेशाची मूर्ती विराजमान असल्याने अंगणातून देखावे पाहत जाऊन शेवटी देवदर्शन घेऊन लोक आनंद लुटतात.
गेल्या वर्षी त्यांनी स्वामी समर्थांचे देऊळ, त्यांचा वाडा व अन्य पौराणिक देखावे साकारले होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठलऊपी श्री गणेश व त्यांचा वाडा दाखवलेला आहे. त्याचबरोबर अंगणात पंढरीची वारी, संत सखू (श्री विठ्ठल सखूवर प्रसन्न होऊन दळण दळताना), संत गोरा कुंभार (मातीबरोबर आपल्या मुलाला मळताना), संत तुकाराम (प्रवचन सांगताना), संत ज्ञानेश्वर (रेड्याच्या तोंडून मंत्र वदवून घेताना) असे सुंदर देखावे या पाच भावंडांनी साकारलेले असून ते भक्तांचे लक्ष वेधून घेतात. बाबनी, रोहिदास, सुकांत, तुळशीदास व सुभाष नाईक अशी ही पाच भावंडे अगदी देवभोळी असून त्यांच्याबरोबर घरची मंडळी मिळून एकूण 26 लोक या कार्यात कार्यरत असतात. या देखाव्यात श्री गणेशाची विठ्ठलऊपी मूर्ती मदन हरमलकर, मांद्रे व देखाव्यासाठी काही चित्रे सुहास मांद्रेकर यांनी रंगवलेली आहेत. दोन महिने मेहनत करूनही व स्वत: पदरमोड करूनही ही मंडळी स्पर्धेसाठी नावनोंदणी करत नाहीत हे विशेष. एकूण 11 दिवसांचा उत्सव येथे साजरा करण्यात येतो. श्री गणेशाचे दर्शन घेण्यास आणि देखावे पाहण्यास भाविकांनी आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन रोहिदास नाईक यांनी केले आहे.









