वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय वरिष्ठांच्या फेडरेशन अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या पोल व्हॉल्टमध्ये देवकुमार मीनाने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. त्याने या क्रीडा प्रकारात 5.35 मी.ची नोंद केली. या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पात्रतेची मर्यादा 5.51 मी. आहे.
देवकुमार मीनाने यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकारात स्वत:च नोंदविलेला 5.32 मी.चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. फेडरेशन अॅथलेटिक्स स्पर्धेत देवकुमारने पोल व्हाल्ट प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. रिगेनने 5.10 मी.चे अंतर नोंदवित कांस्य तर गौतमने 5.15 मी. चे अंतर नोंदवित रौप्य पदक पटकाविले.
या स्पर्धेत पुरुषांच्या 110 मी. अडथळ्याच्या शर्यतीत तेजस शिरसेने 13.65 सेकंदाचा अवधी घेत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. या क्रीडा प्रकारात मानवने 13.94 सेकंदाचा अवधी घेत दुसरे तर मोहम्मद लेझानने 14.17 मिनिटांचा कालावधी नोंदवित तिसरे स्थान घेतले. पुरुषांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत टी. के.विशालने सुवर्णपदक मिळविताना 46.19 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात जयकुमारने दुसरे तर टी.मनुने तिसरे स्थान मिळविले. सर्व्हेश कुशारेने पुरुषांच्या उंचउडीत सुवर्णपदक मिळविताना 2.26 मी. चे अंतर नोंदविले. डेव्हीड टी. याने पुरुषांच्या लांबउडीत सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या थाळीफेकमध्ये सीमाने सुवर्णपदक मिळविताना 57.17 मी.ची नोंद केली. या क्रीडा प्रकारात भावना यादवने रौप्य आणि प्रियाने कांस्यपदक घेतले.









