सौरभ मुजुमदार, कोल्हापूर
Kolhapur News : कोल्हापुरातील महानगरपालिकेच्या एका दवाखान्यामध्ये सुमारे ११३ वर्षांपूर्वीचे एक अमूल्य तैलचित्र आहे.जे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या आदेशानेच एका दरबारी चित्रकाराकडून काढून घेतलेले होते.राजर्षी शाहू महाराज यांच्या पणजी व छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या पत्नी म्हणजे देवी अहिल्याबाई राणीसाहेब होत.या राणीसाहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे यांना देशी औषधे व झाडपाल्यांची परिपूर्ण माहिती होती.राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या नावे “देवी अहिल्याबाई मोफत आयुर्वेदिक दवाखाना ” जुना राजवाड्याशेजारी चालू केलेला होता.हाच कालांतराने नगरपालिकेने आपल्याकडे चालविण्यास घेतला.जो सध्या शाहूपुरी गवत मंडई येथे ” श्री अहिल्याबाई आर्यांग्ल दवाखाना ” या नावाने आजही चालू आहे.
अहिल्याबाई महाराणींच्या स्मृती प्रित्यर्थच १९ मे १९१० रोजी कोल्हापूर येथे श्री मा.अहिल्याबाई राणीसाहेब यांची ऑइल पेंटिंगची तसबीर ठेवणे बाबत आवश्यक रकमेची मंजुरी दिले बाबत ( दवाखाना-ठराव क्रमांक 1091) व त्यासाठी रुपये 162 ची स्पेशल मंजुरी देण्यात आली,असा आदेश राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या स्वाक्षरीने दिलेला आहे.
वास्तववादी चित्रशैलीतील चित्रांकरिता सुप्रसिद्ध असे महाराजांचे दरबारी चित्रकार म्हणून राजाश्रय लाभलेले १९ व्या शतकातील जवळजवळ १५ ते २० हजार चित्रे काढणारे महान चित्रकार म्हणजे आबालाल रहिमान होय.त्यांचा व महाराजांचा एवढा जिव्हाळा होता की राजर्षी शाहू महाराज यांच्या निधनानंतर आपल्या कलेचा चाहता व रसिक या जगात आता राहिला नाही म्हणून त्यांनी आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रामध्ये सोडली असे जाणकारांकडून सांगितले जाते. २३ सप्टेंबर १९१० च्या राजर्षी शाहू महाराजांच्या स्वाक्षरीच्या आणखीन एका आदेशानुसार हेच चित्र आबालाल रहिमान यांच्याकडून काढून घेऊन एका देशी दवाखान्यात ठेवण्याबाबत मंजुरी दिलेली होती हे स्पष्ट होते.
कोल्हापुरातील शाहूपुरी मधील गवत मंडईत असणाऱ्या या दवाखान्यामध्ये लाकडी खुर्चीवर बसलेल्या देवी अहिल्याबाई राणीसाहेब यांचे हे दुर्मिळ व मौल्यवान चित्र सुदैवाने सुस्थितीत असलेले आपणास आजही पाहावयास मिळते.ज्यावर तत्कालीन साल व आबालाल रहिमान यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आढळतो.महाराजांनी नंतर याच राणीसाहेबांचे देऊळ नर्सरी बागेत बांधण्याचा आदेश २४ एप्रिल १९११ रोजी दिलेला होता.इ.स. १८८१-८२ या काळात अहिल्याबाई राणीसाहेबांच्या नावाने जुना राजवाड्याच्या पूर्व भागात प्राथमिक शिक्षण देणारी मुलींची एक शाळा उघडण्यात आलेली होती. हीच कालांतराने मंगळवार पेठेतील खासबागेमध्ये स्थलांतरित झाली असे समजते.या शाळेमध्ये देखील आजही एक अहिल्याबाई राणीसाहेबांचे दुर्मिळ चित्र असल्याचे राहुल माळी यांच्या अभ्यासातून उघडकीस आले व येथूनच पुढे आम्हाला हे मूळ छायाचित्र शोधण्याची दिशा गवसली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज,देवी अहिल्याबाई राणीसाहेब तसेच आबालाल रहमान व हजारो शाहू प्रेमी यांच्या स्मृती जपणाऱ्या या दुर्मिळ तैलचित्राचे तसेच या पवित्र वास्तूचे योग्य संरक्षण व संवर्धन होणे हे अत्यावश्यकच आहे.ज्याप्रमाणे कस्तुरी मृगालाच आपल्या जवळील मौल्यवान कस्तुरीची माहिती नसते त्याचप्रमाणे आपल्यालाही या अशा मौल्यवान चित्राचे महत्त्व अद्यापही समजलेले नसावे असे वाटते. दररोज हजारो लोक याच रस्त्यावरून ये जा करतात.बाहेरून सहज डोकावले तरी हे चित्र सहज स्पष्ट नजरेस येते.
अत्यंत दुर्मिळ ठेवा महापुरात नष्ट होण्याच्या मार्गावर
शाहूपुरीतील गवत मंडईत असणाऱ्या ओढ्याशेजारीच हा दवाखाना असल्या कारणाने यापूर्वीही दोनवेळा महापुरामध्ये हे तैलचित्र पाण्यामध्ये गेलेले होते.तरीसुद्धा आबालाल रहिमान यांनी वापरलेल्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रंग कामामुळे हा ठेवा अजूनतरी सुस्थितीत आहे.यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ही अमूल्य संपत्ती सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून सदरची वास्तू जतन व्हावी.तरच राजर्षी शाहू महाराजांच्या मूळ उद्देशाचा पाया आणखीनच भक्कम होईल.









