आपल्या 400 रूपयांच्या मागणीसाठी आम्ही ठाम आहोत, पण जर कारखानदार आणि सरकार शेतकऱ्यांच्या दराबाबत सकारात्मक असेल तर असेल तर आम्ही एक पाऊल मागे येऊ अशी भुमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधाी यांच्या मध्ये उद्या होणारी बैठक जर फिस्कटली तर कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालू असा इशाराही राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
मागिल हंगामातील 400 रूपयांचा हप्ता आणि यावर्षीच्या हंगामातील ऊसाला 3500 रूपये दर द्यावा या मागणीसाठी जयसिंगपूर येथे उपोषणाला बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माध्यमाशी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षीच्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रुपये मिळावा या मागणीवर आम्ही ठाम आहोत. उद्याची बोलणी फिस्कटली तर शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेराव घालणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रविवारी 19 नोव्हेंबरला जिल्ह्यात ‘चक्काजाम आंदोलन’ होणार आहे. य़ानंतरही साखर कारखानदारांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 19 तारखेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे. आम्ही चारशे रुपये मागणीवर ठाम आहोत मात्र चर्चेसाठी आले तर मागे पुढे काहीतरी होईल मात्र प्रसाद दिल्याप्रमाणे गेल्या तर ते आम्हाला मान्य नाही.” असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
भाजपचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या महिलांसोबत हुज्जत घालतानाच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, “पैशाचा आणि सत्तेचा माज आल्यानंतर महिलांसोबत अश्या पद्धतीने वर्तन करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं की हेच गोर गरीब माणसं आपल्याला मत देऊन कारखाना आपल्या ताब्यात देतात त्यांचीच अवहेलना केली तर जनता माफ करत नाही.” असा टोला त्यांनी प्रकाश आवाडे यांना दिला आहे.
महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे सध्या मला ऊस उत्पादकांचे प्रश्न आणि त्याला चारशे रुपये मिळवून कसं द्यायचं हेच दिसत आहे. लोकसभा निवडणुकी संदर्भात या आंदोलनानंतर विचार करेन आणि विचार करताना सर्व विरोधक एकत्र येत निवडणूक लढवण्याचा योजना करत आहेत आणि हे सर्वजण मिळून शेतकऱ्यांच्या आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणाबरोबर आणि का मैत्री करावी याचाही आम्हाला विचार करावा लागेल. कोण आम्हाला गृहीत धरतं हे पाहण्यापेक्षा आम्ही काय निर्णय घेतो हे महत्त्वाचा आहे.” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.