अल्पसंख्याक आणि बिगर मराठी तसेच बिगर हिंदी भाषिकांच्या मतांमुळेच मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडणूक जिंकल्याचा दावा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. काल देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात बोलताना उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला केला. तसेच महाविकास आघाडी ही राज्यामध्ये फेक नेरेटिव्ह पसरवण्यात यशस्वी झाली असल्यानेच्या भाजपच्या जागा कमी झाल्या असा आरोप केला. अबकी बार चारसो पार या नाऱ्याचा भाजप संविधान बदलण्यासाठी करणार असल्याचा चुकिचा संदेश सोशल मीडीयाच्या माध्यमांतून देण्यात आल्याचा आरोपही उपमुख्यमंत्र्यांनी केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते पुढे म्हणाले की, अल्पसंख्याक समुदायाला आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गेल्या ६ महिन्यांपासून ‘माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ या वाक्याने आपल्या भाषणाची सुरुवात करणे बंद केले आहे. तसेच या निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान इंडिया गटाकडून खोटा प्रचार केला असून भाजपला संविधान बदलण्यासाठी 400 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे देशातील आरक्षण संपुष्टात येणार अशा अफवा पसरवल्या.” असेही ते म्हणाले.
आपल्या पराभवाचं विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आपले राजकिय गणित चुकल्याचं मान्य केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रात राजकिय गणित आपच्य़ा विरोधात गेलं हे खर आहे. पण भाजपला मिळालेल्या मतांमध्ये कुठेही कमतरता पडली नाही. भाजपला ४३. ६ टक्के तर महाविकास आघाडीला ४३. ९ टक्के मते पडली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला विजय मिळाल्याचा आभास तयार करता आला. संपूर्ण इंडिया आघाडी मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून जास्त जागा भाजपाला मिळाल्या आहेत. भाजपची लढाई फेक नरेटिव्हशी होती आम्ही इंडिया आघाडीशी हरलो नाही तर फेक नरेटिव्हमुळे कमी पडलो आहे. देशातल्या ७६ जागा अशा आहेत जिथे कमी फरकाने आपण पडलो. संविधान बदलणार या खोट्या प्रचारामुळे या गोष्टी घडल्या.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठी मते उद्धव ठाकरेंना पडली नाहीत…
“मुंबईत लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या ४ जागा केला तर लक्षात येईल की सामान्य मुंबईकर आणि मराठी माणसांनी उद्धव ठाकरेंना मतदान केलं नाही. तसेच मुंबईत चार- चार पिढ्या घालवलेल्या उत्तर भारतीय मुंबईकरांनी ठाकरेंना मतदान केलं नाही. मागले ४ महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, तसेच ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो म्हणलं सोडलं होतं. तसंच ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणं सोडून जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं. केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी राजकिय गणित जिंकल” असा दावा करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना मिळालेली मते ही अल्पसंख्याकांची असल्याचं म्हटलं आहे.