ऑनलाईन टीम/ तरुण भारत
चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्वप्रकारचे लोक याठिकाणी येतात. पण यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करुन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना चोंडीला जाताना पोलिसांनी अडवले. या घटने नंतर फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडीवर निशाणा साधताना ते म्हणाले, राम शिंदे (Ram Shinde) हे अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत त्यांनाही त्रास देण्यात आला आहे. गोपिचंद पडळकर हे अहिल्यादेवींच्य़ा विचाराने चालतात त्यांनाही अडवले जात आहे. यांना का अडवले जात आहे असा सवाल त्यांनी केला. यासंदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आणि हायजॅक बंद झाले पाहिजे असेही ते म्हणाले.
राज्यसभा उमेदवारी संदर्भात बोलताना ते म्हणाले, भाजपातील सर्व आमदार सद्सद्बुध्दीचा वापर करुन मते देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले, सूर्याकडे बघून थुंकले की थुंकी आपल्याच तोंडावर पडते. त्यांनी सूर्याकडे बघून थुंकण्याचा प्रयत्न केला आहे. थुंक त्यांच्या तोंडावरच पडेल असा टोलाही लगावला.
पडळकरांना, खोत यांना का अडवले, नेमके प्रकरण काय
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चोंडीला जात होते. तेव्हा त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं. यावेळी समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत याचा निषेध केला. या घटनेनंतर पडळकरांनी मविआवर टीकास्त्र सोडले. चौंडीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. त्यांना परवानगी दिली जाते मग आम्हाला अभिवादन करण्यापासून रोखण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी केला. रोहित आणि शरद पवार या आजोबा आणि नातवाने प्रशासनवर दबाव आणला आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, सदाभाऊंनी ही टीका केली आहे.
शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना सदाभाऊ खोत म्हणाले, चौंडीचा सातबारा पवारांच्या नावावर नाही. ती पवारांची जहागिरी नाही, त्यामुळे आम्हाला अडवण्याचा त्यांना अधिकार नाही. अशी टीका त्यांनी केली आहे.