CM यांनी स्वत:हून शासकीय महापूजेचे निमंत्रण रद्द केल्याची एकमेव घटना
By : चैतन्य उत्पात
पंढरपूर : आषाढी वारी आणि मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा हे जणू समीकरणच जुळून आले आहे. पण मराठा आरक्षण आंदोलन पेटल्याने 2018 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हून शासकीय महापुजेचे निमंत्रण रद्द केले होते. मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी यायचे. ही परंपरा आजही सुरू आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने काही दिवसांपूर्वीच मुंबई येथे जाऊन शासकीय महापूजेचे निमंत्रण मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. पण 2018 साली मराठा आरक्षण आंदोलन पेटल्याने महाराष्ट्रभर वातावरण पेटले होते. या आंदोलनाचाच भाग म्हणून मराठा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पंढरीत महापूजेला येऊ द्यायचे नाही, असा निर्धार करत गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करायचे ठरवले होते.
यावेळी अट्टाहास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर पंढरपूर येथे आले असते तर हिंसक वळण लागण्याची शक्यता होती. सी.आय. डी.कडे याची गुप्त माहिती होती. 23 जुलै 2018 रोजी आषाढी देवशयनी एकादशी होती. त्यामुळे 22 तारखेलाच फडणवीस शासकीय विश्रामगृहात येणार होते. पण त्यांना काहीतरी गंभीर होणार, याची कुणकुण लागली होती आणि तेव्हा पंढरपूर येथे दहा लाखांवर भाविक उपस्थित होते.
अनेक मराठा आंदोलक चिडले होते. वारीच्या गर्दीत विषारी भयंकर साप सोडण्याची भाषा केली जात होती. पोलिसांनी आदल्या दिवशीच शेकडो मराठा आंदोलकांची धरपकड करून त्यांना जेलमध्ये टाकले होते. आंदोलनाला हिंसक वळण लागले असते तर कोणतीही दुर्घटना घडली असती, असे घडले असते तर महाराष्ट्राला देशाने माफ केले नसते.
यामुळे फडणवीस यांनी चक्क शासकीय महापूजेचे निमंत्रण फेटाळून पंढरपूर दौरा रद्द केला आणि मुंबई येथेच वर्षा निवासस्थानी श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या छोट्या मूर्तीची महापूजा केली. यामुळे मोठा वाद, आणि राज्यावरील संकट टळले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून शासकीय महापूजेचे निमंत्रण रद्द केल्याची ही एकमेव घटना ठरली.








