पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / बेळगाव
खेडय़ांच्या विकासातून देशाचा विकास झाला पाहिजे, अशी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजींची धारणा होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या वेळी त्यांचे हे स्वप्न साकार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांनी केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, कन्नड व संस्कृती खात्याच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर टिळकवाडी येथील वीरसौधच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
खेडय़ांचा विकास झाला तरच खऱया अर्थाने देशाचा विकास होणार आहे. म्हणून खेडे विकसित झाले पाहिजे. शेतकरी, शेती, लघुउद्योग व ग्रामीण भागात शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. शिक्षणामुळेच खेडय़ांचा विकास शक्मय आहे. त्यामुळे त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
एकेएएम अंतोदय कार्यक्रम नव्वद दिवस तेरा खात्यासंबंधी जागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक सेनानींचा गौरव करून त्यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., मनपा आयुक्त डॉ. रुदेश घाळी, कन्नड व संस्कृती खात्याच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री, मनपाच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी आदी उपस्थित होते.