अ.भा. सहकारी अध्यक्ष दीनानाथ ठाकुर : बेलगाम अर्बन सहकारीचा सुवर्णमहोत्सव
प्रतिनिधी/ बेळगाव
सहकारी संघ यशस्वी होण्यासाठी सहकाराची मूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. देशाचा विकास होत असला तरी सहकाराच्या मूल्यांशिवाय अशक्य आहे. त्यासाठी सहकाराची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला महत्त्व देऊन सहकार सचिवालय निर्माण केले आहे. त्यामुळे सहकाराला अधिक बळकटी मिळणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय सहकार भारतीचे अध्यक्ष दीनानाथ ठाकुर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
येथील दी बेलगाम अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लि. सोसायटीच्या सुवर्ण महोत्सव समारंभात ते बोलत होते. येथील लोकमान्य रंगमंदिरमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुणराव बेडेकर होते. चिन्मय सेवा ट्रस्टच्या स्वामीनी प्रज्ञानंदा यांचे दिव्य सानिध्य लाभले होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रांत संचालक अरविंद देशपांडे, सहकार भारतीचे राज्याध्यक्ष राजशेखर शिलवंत, कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी निगमचे संचालक जगदीश कवटगीमठ उपस्थित होते.
ते म्हणाले, देशामध्ये अनेक समस्या आहेत. अन्न सुरक्षा, बेरोजगारी, हवामानात होणारे बदल, आर्थिक अशा समस्यांनी डोके वर काढले आहे. यामध्ये सामाजिक अस्थिरता ही मोठी समस्या आहे. यामुळे समाजाची मोठी हानी होत आहे. परिणामी आर्थिक विकासाला मोठा फटका बसत आहे. ही स्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. सामाजिक अस्थिरतेमुळे देशाच्या दरडोई उत्पन्नात घट होत आहे. यासाठी सर्वांनी सांघिक प्रयत्न करणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे. देशाच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी सहकारची मूल्ये जोपासली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक अस्थिरता दूर करण्यासाठी भौतिक आणि आध्यात्मिक मार्गांचा अवलंब करणे आवश्यक आहे. भौतिक मार्गाचा अवलंब करून सर्वांना आर्थिकरीत्या सशक्त करणे आवश्यक आहे. देशाची वाढती लोकसंख्या पाहिल्यास अन्न सुरक्षा व रोजगार निर्माण करणे गरजेचे आहे. सरकारकडून प्रयत्न केले जात असले तरी आपणा सर्वांचीही ती जबाबदारी आहे. सहकाराची मूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. सहकाराच्या मूल्यांवर कार्य करत राहिल्यास देशाचे कल्याण होण्यास वेळ लागणार नाहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वामीनी प्रज्ञानंद म्हणाल्या, जगण्यासाठी भौतिक व आध्यात्मिक मार्गांची आवश्यकता आहे. भौतिक मार्गासाठी धनाची गरज आहे. आध्यात्मिक मार्गासाठी एकमेकांबद्दल करुणा भाव ठेऊन वाटचाल केली पाहिजे. केवळ पूजा-अर्चा करून उपयोग नाही तर माणसाला गरजेच्या वेळी मदत केली पाहिजे. तीर्थक्षेत्राला जाऊन गंगास्नान करण्यापेक्षा आई-वडिलांची सेवा करून पुण्य कमावले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी वंदे मातरम् गीत संयुक्त गोखले यांनी सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली. अरुणराव बेडेकर यांनी स्वागत केले. रामचंद्र एडके यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. महादेव काळे यांनी अहवाल सादर केला. माजी संचालक व निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष भालचंद्र कल्लेद, संचालक सुहास गुर्जर, राजेंद्र हंडे, किशोर श्रेयकर, सदानंद कपिलेश्वरी, पांडुरंग नायक, जयंत कंग्राळकर, स्मिता गाडगीळ, सुजाता बांडगी, सीईओ नेहा नरगुंदकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, सभासद, हितचिंतक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









