संरक्षण संशोधन आणि विकास संस्था प्रमुखांचे प्रतिपादन
@ बेंगळूर / वृत्तसंस्था
महत्वाच्या आणि जटील संरक्षण साधनांचा विकास आता झपाटय़ाने भारतातच होत आहे. यांमध्ये प्रिसिजन गायडन्स साधने, वैमानिकाची सीट इजेक्शन प्रणाली आणि पायरोटेक्निक काडतुसे आदी वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू आपल्याला आयात कराव्या लागतात. त्या देशातच निर्माण करण्याच्या कार्यात मोठी प्रगती होत आहे, असे वक्तव्य भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख समीर कामत यांनी येथे एअरो शोच्या निमित्ताने बुधवारी केले.
आपली संस्था डीआरडीओ आपल्या मानवरहीत वायू वाहनासाठी स्वदेशनिर्मित इंजिन निर्माण करीत असून त्याचे काम वेगात होत आहे. लवकरच हे इंजिन सादर केले जाईल. सीट इजेक्शन प्रणालीचा विकास जवळपास पूर्ण झाला आहे. ‘तपस’ या युएव्हीचे इंजिनही विकसीत करण्यात आले आहे. अशी 180 ‘तपस’ मानवरहीत वायुवाहने निर्माण केली जाणार आहेत. हे इंजिन ‘तपस’ या वायू वाहनाला 17,000 फूट उंचीपर्यंत नेऊ शकते. याच्या अनेक चाचण्या झाल्या असून त्या समाधानकारकरित्या पार पडल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
एअरो इडिया प्रदर्शनात डीआरडीओने 321 संरक्षण उत्पादने प्रदर्शित केली आहेत. या साऱयांचे तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यात आले आहे. यांच्यातील काही उत्पादन संरक्षणासाठी अत्याधिक महत्वाची आहेत. एअर डिविव्हर्ड बॉम्ब्सचाही या साधनांमध्ये समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या आठ वर्षांमध्ये प्राधान्य
गेल्या आठ वर्षांमध्ये भारतात स्वदेशनिर्मित संरक्षणसाधनांवर भर देण्यात आला आहे. नवे तंत्रज्ञान मोठय़ा प्रमाणात विकसित करण्यात आले. यामुळे संरक्षण विभागाचे विदेशांवर असणारे अवलंबित्व कमी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. आठ वर्षांपूर्वी 80 टक्के संरक्षण सामग्री आयात करावी लागत असे. आता हे प्रमाण 56 टक्क्यांहूनही कमी झाले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.









