देशाच्या परिवहन क्षेत्राचा कायापालट करणार हायपरलूप तंत्रज्ञान
वृत्तसंस्था/ चेन्नई
सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला अत्याधुनिक करण्यासोबत त्याला वेग देण्याकरता देशात मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात नवोन्मेष होत आहे. शहरांदरम्यान रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीमसारखे नवे परिवहन माध्यम तयार झाले आहे. याच क्रमात आता भविष्यातील परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने आयआयटी मद्रासने गतिमान पावले टाकली आहेत. आयआयटी मद्रासकडून हायपरलूपचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. हायपरलूप तंत्रज्ञानात पॉडचा वापर होत असतो आणि पहिल्या टप्प्प्यात आयआयटी मद्रासच्या पथकाकडून ‘पॉड’ तयार करण्यात आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 500 मीटरच्या ट्यूबच्या तंत्रज्ञानाचे परीक्षण केले जाणार आहे. या तंत्रज्ञानासाठी आयआयटी मद्रासला आतापर्यंत तीन पेटंट मिळाले आहेत.
हायपरलूप तंत्रज्ञानाला विकसित करत असलेल्या आविष्कार टीममध्ये आयआयटी मद्रासच्या प्राध्यापकांच्या दिग्दर्शनात 11 विभागांच्या 77 विद्यार्थ्यांचे पथक निरंतर कार्य करत आहे. दरवर्षी या टीममध्ये नवे साथीदार सामील होत राहतात, जेणेकरून विचारांमध्ये नावीन्य कायम राहिल. हायपरलूप तंत्रज्ञान प्रवासी आणि कार्गो दोन्ही प्रकारच्या परिवहनासाठी विकसित केले जात आहे. या नव्या परिवहन तंत्रज्ञानाची गरज आणि शक्यता पाहता भारतीय रेल्वेने आयआयटी मद्राससोबत तंत्रज्ञानाच्या विकासासाठी वित्तीय मदत उपलब्ध करविण्याचा करार केला आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित पथकाची भेट देखील घेतली आहे. काही काळापूर्वीच टाटा स्टीलने ट्यूबच्या विकासासाठी आयआयटी मद्रासच्या या प्रकल्पात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर हायपरलूप तंत्रज्ञानावर कार्यरत असलेले टीयूटीआर स्टार्टअप देखील यात भागीदार असणार आहे. टीयूटीआर युरोपमध्ये हायपरलूप तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या स्टार्टअपसोबत जोडले गेले आहे.
हायपरलूप तंत्रज्ञानाला फिफ्थ जनरेशन ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हटले जाते. आयआयटी मद्रासमध्ये आम्ही याला स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यावर वेगाने काम करत आहोत असे आयआयटी मद्रासमधील एअरोस्पेस इंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक अन् नॅशनल कंबशचन रिसर्च इन्स्टीट्यूटचे प्रमुख सत्य चक्रवर्ती यांनी सांगितले आहे.
ट्यूब सर्वात महत्त्वाचा हिस्सा
या तंत्रज्ञानात ट्यूब सर्वात महत्त्वाचा हिस्सा आहे. याच्या आतून पॉड वेगाने धावू शकेल, याकरता प्रोप्लशन, लेव्हिटेशन आणि व्हॅक्यूम टेस्टचे परीक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गोल आकार असलेल्या 3.6 मीटर लांब ट्यूबमध्ये परीक्षण यशस्वी ठरले आहे. आता आयआयटी मद्रासच्या अन्य कॅम्पस तैय्यूरमध्ये 500 मीटर ट्रॅकमध्ये परीक्षण केले जाणार आहे. प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात 2028-30 दरम्यान चेन्नईहून बेंगळूरदरम्यान 340 किलोमीटर लांब मार्गावर परीक्षण करण्यात येईल. या प्रकल्पाकरता अनुमानित खर्च 9,100 कोटी रुपये इतका आहे. ट्यूबच्या आत पॉड सुमारे 1 हजार किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावणार आहे.









