राज्यात जिल्हा प्रथम येण्यास कामाचा वेग वाढवा : बैठकीत जिल्हाधिकाऱयांच्या अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ाचा विस्तार हा मोठा आहे. या जिल्हय़ाची लोकसंख्याही अधिक आहे. त्यामुळे राज्याच्या प्रगतीला हा जिल्हा पूरक ठरणार आहे. तेव्हा कोणत्याही शासनाच्या योजना किंवा राबविण्यात येणाऱया विकासासंदर्भातील योजना तातडीने पूर्ण केल्या पाहिजेत. कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी सर्व विभागातील अधिकाऱयांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम केले पाहिजे. तेव्हा संपूर्ण जिल्हय़ाला श्रेय मिळेल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागातील अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱयांना मार्गदर्शन करताना वरील सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांना विकासाला गती द्यायची आहे. तेंव्हा सर्व विभागातील अधिकाऱयांनी त्याकडे लक्ष द्यावे, लोकांच्या अपेक्षा आणि सरकारची अपेक्षा समजून घेऊन सक्रिय झाले पाहिजे. त्यामुळे सर्व प्रकल्प आणि कामे पूर्ण होतील याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही प्रकल्पाच्या फाईल्स प्रलंबित ठेवू नये. सध्या 15 हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. येत्या काळात कोणत्याही विभागात एकही अर्ज प्रलंबित राहिल्यास त्याचे कारण स्पष्ट करावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा ईशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. अधिकाऱयांनी तालुका कार्यालयामध्ये भेटी देऊन प्रगतीचा आढावा घ्यावा. सध्या अर्थसंकल्पामधून जाहीर झालेल्या प्रकल्प व कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले.
विमानतळ परिसरात कत्तलखान्यांना परवानगी नको
विमानतळ परिसरात कत्तलखान्याला मान्यता देऊ नका. कारण त्यामुळे विमान अपघात होऊ शकतो. याची काळजी घ्या, कत्तलखान्यांमुळे पक्ष्यांचा थवा विमान परिसरात वावरत राहतो. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विमानतळ परिसरात मांसाहारी दुकानांना परवानगी देऊ नये, असे त्यांनी सांगितले. सध्या मांसाहारी दुकानातील कचऱयाची समस्या गंभीर बनत चालली आहे. तेंक्हा याबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी कामासंदर्भातील निविदा प्रक्रियेसह सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करायची आहेत. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान यासारखे मोठे प्रकल्प राबविण्यास प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले. नरेगा योजनेंतर्गत 84 तलावांचे खोदाईकरण करण्यात आले आहे. याचबरोबर तलावांची सफाई करण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तहसीलदारांनी याबाबत पुढाकार घ्यावा, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्यासंदर्भातील आयुष्मान भारत योजना राबविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कार्डाचे वितरण करा, कोविड तपासणीचे प्रमाणदेखील वाढविले पाहिजे, जनतेला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी एकत्रितपणे काम करा, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महानगरपालिका आयुक्त रुदेश घाळी, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









