जुने गोवे येथे राज्यस्तरीय गांधी जयंती साजरी; धर्मगुरुंकडून भगवद्गीता, बायबल, कुराणातील श्लोकांचे पठण
तिसवाडी : आज गोव्यात आपण सर्वोदय, ग्रामोदय आणि अंत्योदय याबद्दल बोलतो आणि त्या दृष्टीने अनेक पावले टाकतो आहोत. गांधीजींनी ही संकल्पना शंभर वर्षांपूर्वी मांडली होती. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न करत आहोत. देशाचा विकास हा खरा विकास ठरत नाही, जोपर्यंत समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास होत नाही. गोव्यात आज अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत, ज्यामुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचत आहे. जुने गोवे येथे राज्यस्तरीय महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर, खोर्ली जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक,जुने गोवे उपसरपंच अंबर आमोणकर यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
‘स्वयंपूर्ण गोवा’ची पाच वर्षे पूर्ण
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ‘स्वयंपूर्ण गोवा’ अभियानाला आज 5 वर्षे पूर्ण होत आहेत. ते गोवा, गाव आणि शहर स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नांना पूरक ठरले आहे. या अभियानामुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे शक्मय झाले आहे. सरकारच्या सर्व योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये हर घर जल, हर घर बिजली, हर घर शौचालय इत्यादींचा समावेश आहे. या अभियानांतर्गत, तऊणांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी कृषी, फलोत्पादन, पुष्पोपादन, दुग्धव्यवसाय इत्यादी क्षेत्रांना योग्य महत्त्व दिले जाते. मुख्यमंत्र्यांनी माझे घर योजना,दीर्घकालीन रहिवाशांनी बांधलेल्या अनधिकृत घरांना नियमित करण्यासाठी आणि कायदेशीर मान्यता देण्यासाठी एक उपक्रम, 4 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीदरम्यान सुरु केली जाईल अशी माहिती दिली. यावेळी पुरोहित सिद्धेश परांजपे यांनी भगवद्गीता, फादर पॅट्रिसिओ फर्नांडिस यांनी बायबल तर हजरत मौलाना महंमद रफिक यांना कुराणमधील श्लोकांचे पठण केले. कला अकादमीच्या गायन गटाने भजन सादर केले. से ओल्ड गोव्याचे उपसरपंच अंबर आमोणकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले.
जुने गोवे पंचायतीत शास्त्री जयंती
महात्मा गांधीजींच्या पुतळ्याकडील सोह्यांनतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार राजेश फळदेसाई, ओल्ड गोवा पंचायतीचे उपसरपंच अंबर आमोणकर, जिल्हा पंचायतसदस्य सिद्धेश श्रीपाद नाईक आणि इतर मान्यवरांनी ओल्ड गोवा ग्राम पंचायतीने माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि पुष्पांजली अर्पण केली. ओल्ड गोवा पंचायतीत शास्त्री जयंती साजरी करण्याची प्रथा फार जुनी आहे.
स्वच्छतेची जबाबदारी पार पाडा
गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने येथील स्वच्छतेची जबाबदारी अधिक आहे, असे सावंत यांनी नमूद केले. स्वच्छता हीच ईश्वरभक्ती आहे, हा संदेश गांधीजींनी देशाला दिला होता. जर स्थानिक स्वराज्य संस्था जसे की पंचायतींनी आपले परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला तर गोवा देशातील सर्वात स्वच्छ राज्य बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे ते म्हणाले. सरकारने गोव्यात कचरा व्यवस्थापनासाठी अनेक सुविधा उभारल्या आहेत. आता नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.









