भारतीय विज्ञान इन्स्टिट्यूटचे प्रा. गोविंदन रंगराजन : व्हीटीयूत पदवीदान समारंभ
बेळगाव : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान सर्व प्रकारचे उद्योग हिसकावून घेत आहे. ही बाब खरी असली तरी प्राथमिक टप्प्यात अत्यंत सामान्य क्षेत्रात एआय बदल करीत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वैचारिक मनोभाव आणि चिंतन शक्ती वाढण्यास महत्त्वाचे असून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी युवकांनी कौशल्यांचा वापर करावा, असे भारतीय विज्ञान इन्स्टिट्यूट बेंगळूरचे संचालक प्रा. गोविंदन रंगराजन यांनी सांगितले.
येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या 24 व्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या ज्ञानसंगम आवारातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते पुढे म्हणाले, नवीन तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे आपण सर्वांशी संबंध वाढविले आहेत, असे आपण समजतो. मात्र ते केवळ डिजिटल व्यासपीठावरील बांधव्य आहे. प्रत्यक्षात आपली तरुण पिढी एकांगी पडत आहे. तरुणांमध्ये उदासीनता वाढत आहे, ही बाब गंभीर आहे. यासाठी आपण भौतिक आणि भावनात्मक संबंधांना अधिक महत्त्व देऊन समाजजीवी म्हणून जगले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉक्टरेट पदवी मिळविलेले सद्गुरु मधुसूदन साई म्हणाले, थोर परंपरा आणि श्रेष्ठत्वाला महत्त्व देऊन आदर्श समाज निर्माण करण्याचे काम व्हीटीयूकडून सुरू आहे. आजच्या तरुण पिढीने आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाला महत्त्व देऊन समस्यांवर तोडगा काढावा. आपली संस्कृती, परंपरा जपावी, असे त्यांनी सांगितले. गौरव पदवी पुरस्कृत बीआयएलएमबी हरी के. मरार म्हणाले, आजची तरुण पिढीने आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण बंधूभाव वाढविणे आणि अनुभव घेऊन कौशल्यांचा विकास करावा, असे त्यांनी सांगितले.
या पदवीदान समारंभामध्ये बीई 51084, बीटेक 45, बी-प्लान 08, बी-आर्क 1138, पीएचडी संशोधन पदवीधर 339, एमएसई (इंजि.) 1 या पदवीधरांना पदवी प्रदान केली. यावेळी कुलगुरु प्रा. विद्याशंकर एस. यांनी स्वागत करून व्हीटीयूच्या कामगिरीचा आढावा घेतला. निबंधक प्रा. बी. ई. रंगास्वामी यांनी सुवर्णपदक वितरण केले. मूल्यमापन विभागाचे निबंधक प्रा. टी. एन. श्रीनिवास यांनी दीक्षांत समारंभाचे पथसंचलन केले. व्हीटीयूचे डीन प्रा. सदाशिवे गौडा यांच्यासह प्राध्यापक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









