प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकासह अनेक राज्यांमध्ये आपला राजकीय डाव साधण्यासाठी काँग्रेससह अनेक पक्षाच्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे हे सर्वश्रुत आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान तथा निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी दिली. निजदचे राज्य कार्यालय जेपी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि निजद पक्षांमध्ये युती होण्याची शक्मयता आहे का? आणि समविचारी पक्ष राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या विरोधात एकत्र आले तर त्या युतीचे नेतृत्व करणार का?, असे विचारण्यात आलेल्या प्रश्नाला देवेगौडा यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. तसेच, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपविरोधात युती करण्याच्या प्रयत्नांकडेही माजी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यात आले.
देवेगौडांचा पत्रकारांनाच प्रश्न
या देशात भाजपसोबत राजकारण न करणारा कोणताही पक्ष असेल तर मला दाखवा, असा प्रश्न देवेगौडा यांनी केला. आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. मग मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन, असे सांगितले. विविध राज्यांमध्ये अनेक पक्षांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटकात देखील हे पाहू शकतो. यामध्ये दडले आहे तरी काय?, असेही ते म्हणाले.
पक्षसंघटना करणार
ही निवडणूक आपण हरलो हे खरे आहे. त्यामुळे नाराज होण्याची गरज नाही. सर्व कार्यकर्त्यांनी पक्षसंघटनेसाठी पुन्हा जोमाने काम करावे. माझ्यासह आम्ही सर्वांनी अनेक निवडणुका जिंकल्या आणि हरल्या आहेत. त्यानंतर मोठ्या उत्साहाने रिंगणात उतरलो आहोत. आताही आम्ही हरलो म्हणून घरी बसू शकत नाही. मी पक्षासाठी कितीही काम करायला तयार आहे, असे देवेगौडा यांनी स्पष्ट केले.
यापुढे अनेक निवडणुका
बेंगळूर महानगरपालिका, तालुका, जिल्हा पंचायत यासह अनेक निवडणुका आहेत. या निवडणुकांची तयारी करायची आहे. त्याबाबत पक्ष सल्लामसलत करत असून संघटनेवर भर दिला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत किती मतदारसंघ आणि कोणते मतदारसंघ लढवायचे याचा निर्णय पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करून घेतला जाईल, असेही ते म्हणाले.