कोल्हापूर / पूजा मराठे :
देवल क्लब म्हणजे कोल्हापूरकरांचे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच एक हक्काच स्थान. या क्लबला राजर्षि शाहू महाराजांचाही ऐतिहासिक वारसा आहे. कला सृष्टीतील अनेक गाजलेल्या कलाकारांनी त्यांच्या करिअरची सुरुवात या क्लबपासून केली आहे. तर देवल क्लबच्या उभारतीत या क्षेत्रातील दिग्गजांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. कोल्हापूरातील काही हौशींनी गायन, संगीताचा आनंद एकत्रित मिळून घेता यावा यासाठी या क्लबची अगदी घरगुती स्तरावर सुरुवात केली. ब्रिटीश काळात एकत्र येण्याची जागा म्हणजे क्लब म्हटले जात. म्हणून या संस्थाचे नाव गायन समाज देवल क्लब. आजघडीला, गायन समाज देवल क्लब हा शंभर वर्षाहून अधिक काळापासून संगीत क्षेत्रात सेवेत कार्यरत आहे.
गायन समाज देवल क्लब असे नावलौकीक मिळण्याआधीही या संस्थेचा एक मोठा इतिहास आहे. देवल क्लब या संस्थेचे मूळ हे दोन संस्थांशी आहे. तत्कालीन कोल्हापूरात गायनाची निस्सीम सेवा करणाऱ्या दोन संस्था कार्यरत होत्या. त्यामध्ये एक होती करवीर गायन समाज आणि दुसरी होती देवल क्लब. यापैकी करवीर गायन समाज ही संस्था हौशींनी जुन्या राजाराम कॉलेजमध्ये (भवानी मंडपातील) दोन खोल्या भाड्याने घेऊन 1883 साली सुरु करण्यात आले होती. त्यावेळी या खोल्यांचे चार आणे इतके भाडे होते. तिथे किर्तन, गायन, वादन असे विविध कार्यक्रम सादर केले जाते. तर दुसरीकडे 1893 मध्ये संगीतप्रेमी बाबा देवल, त्र्यंबकराव दातार, नातू फौजदार आणि शांताराम बापूंचे वडील राजारामबापू वणकुद्रे यांनी कलेवरच्या निखळ प्रेमापोटी पेपरवाले लुकतुकेंच्या मंगळवार पेठेतील घराच्या माडीवर दोन खोल्यांमध्ये एका क्लबची स्थापना केली. त्यावेळी या क्लबला खास असे काही नाव दिले गेले नव्हते. याच खोल्यांमध्ये बाबा देवल हे वास्तव्यास होते. बाबा देवल यांनी गायनाचा आनंद सर्वांनी एकत्रितपणे घ्यावा यासाठी याची स्थापना होती. कालांतराने बाबा देवलांचा क्लब असे म्हणजे देवल क्लब असे त्याचे नाव पडले. त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे कलाकारांना मानधन दिले जायचे.
1946 मध्ये या दोन्ही संस्था विलीन करण्यात आल्या. आणि गायन समाज देवल क्लब असे नाव देत ही संस्था उदयास आली. इथेपर्यंत या क्लबचे कार्यक्रम त्या लहानशा खोल्यांमध्येच पार पडत होते. पण 1956 साली या संस्थेला जागे निकड जाणवू लागली. अशातच भालजी पेंढारकर, बाबुराव पेंढारकर, व्ही शांताराम यांनी ‘विनोद‘ या नाटाकाची निर्मिती केली होती. हे नाटक ‘संगीत मानअपमान‘ या नाटकाचे विडंबन होतं. योगायोगाने या नाटकाच्या प्रयोगाला ‘राजर्षी शाहू महाराज‘ उपस्थित होते. त्यांना हे नाटक प्रचंड आवडले. त्यानंतर त्यांनी या अवलियांकडे चौकशी केली, तर त्यांनी सांगितले की, गायन समाज देवल क्लब याला स्वत?ची अशी इमारत नसल्याने त्यासाठी आर्थिक रक्कम उभी करण्यासाठी आम्ही या नाटकाचे प्रयोग करत आहोत. तेव्हा शाहू महाराजांनी या संस्थेला फक्त तीन हजार रुपयांची मदतच नाही तर जुन्या देवल क्लबची जागाही देऊ केले. आणि सांगितले, की उर्वरित रक्कम तुम्ही जमा करा. तरी या सर्व कलाकारांनी शक्य तेवढी संस्थेसाठी उभी केली. पण त्यावेळेसचा बांधकाम खर्च हा 10 हजार रुपये असल्याने त्यामध्ये अजूनही तीन हजार रुपये कमी पडत होते. तेव्हा ही सर्व मंडळी पुन्हा शाहू महाराजांकडे गेली आणि उर्वरित बांधकाम खर्चासाठी मदत मागितली. तेव्हा मात्र शाहू महाराज म्हणाले, की मी तुम्हाला आत्ताही मदत करतो, पण ही रक्कम तुम्हाला संस्थानाला परत करावी लागेल. तुम्हाला बिनव्याजी कर्ज देत आहोत. अशा तऱ्हेने हे दहा हजार रुपये कसेबसे जमवून जुन्या देवल क्लबच्या इमारतची कामकाज पूर्ण झाले आणि 1919 मध्ये त्या इमारतीचे राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटनावेळीस भारतातील पहिला आठ दिवसांचा सांगेतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
- शाहू महाराजांचा असा समज झाला की….
देवल क्लबच्या इमारतीचे बांधकाम जेव्हा सुरु होते. तिथपर्यंत राजर्षी शाहू महाराजांचा असा समज होता की, नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या क्लबची स्थापना करण्यात आली आहे. उद्घाटनाच्या आधी आठ दिवस शाहू महाराज इमारतीची पाहणी करण्यासाठी आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा क्लब संगीतप्रेमी बाबा देवल यांनी सुरु केला असल्याने देवल क्लब असे त्याचे नाव पडले. तेव्हा त्यांनी कलामहर्षी बाबुराव पेंटरांना बोलावून देवल मास्तरांचे चित्र बनविण्यास सांगितले. आणि आठ दिवसात पेंटरांनी ते बनविले. आणि मग उद्घाटनावेळेस ते देवल क्लबमध्ये लावण्यात आले.
बाबा देवल यांनी सुरु केलेल्या क्लब नाव असे काही न्हवते. पण बाबा देवल यांच्या घरी आणि त्यांच्या पुढाकाराने या क्लबचे कार्यक्रम होत असत. त्यामुळे नकळतच या क्लबचे देवलांचा क्लब म्हणजे देवल क्लब असे नाव पडले.








