एकतिसावा शुकमुनी श्रीकृष्णाचे निधन झाले आहे हे समजल्यावर द्वारकेत कसा हाहाकार माजला होता ते सांगत आहेत. ते म्हणाले, श्रीकृष्णाचे निधन झाले आहे ही गोष्ट दारुकाने सांगितल्यावर द्वारकेत एकच बोंब उठली. उग्रसेन कपाळ पिटून घेऊ लागला, वसुदेव डोके आपटून घेऊ लागला, प्रजाजन निरनिराळ्या पद्धतीने दु:ख व्यक्त करू लागले. सर्व स्त्राrपुरुष बोंबलत सुटले आणि शंख करत घरोघरी पोहोचले. कुणी कुणाचे सांत्वन करायचे हाच प्रश्न होता कारण सर्वांनाच अत्यंत दु:ख झाले होते.
देवकी आणि रोहिणी मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. थोड्यावेळाने दोघी एकदमच शुद्धीवर आल्या आणि त्यांनी एकच आकांत मांडला. कृष्णा तू आमचा विसावा आहेस असा कसा आम्हाला सोडून गेलास लवकर परत ये. तू आमच्यावर रुसला आहेस का असे त्या वारंवार म्हणू लागल्या. आम्ही तुझ्या पाया पडतो अरे तू आमचा कैवारी आहेस आणि आता तूच आम्हाला सोडून दूर निघून गेलास असे म्हणून त्या विलाप करूलागल्या.
पुढे म्हणाल्या, चाणूर, कंस अशा महाबलाढ्या मल्लाना जिंकून बंदीवासातून तू आमची सुटका केलीस आणि शेवटी आम्हाला येथे सोडून गेलास इतका निष्ठुर कसा झालास? देवकी म्हणाली, माझ्या गेलेल्या मुलांना परत आणून तू आम्हाला सुखी केलेस परंतु शेवटी मला ठकवून निघून गेलास असं का केलंस? माझ्या मुला कृष्णराया वेगाने परत ये. कृष्ण सोडून गेला म्हणून तिला आणखी एक शंका आली.
ती बोलून दाखवताना ती म्हणाली, मी तुला पान्हा पाजला नाही म्हणून रुसलास का? पण असं असेल तर जिने तुला स्तनपान केले तिलाही तू सोडून गेलास की रे! ती किती दिनवाणी झाली आहे पहा. तुझा चेहरा पहायला मिळाला नाही तर आमच्या शरीरात प्राण तरी राहतील का? म्हणून कृष्णा सत्वर धावत ये आणि चारही हातांनी मला आलिंगन दे. तुझ्या मुखाचे मला चुंबन घेऊ दे. मी त्यासाठी दिनवाणी झाली आहे रे! माझ्या श्यामसुंदरा, राजीवलोचना, सुकुमारा, चतुर्भुजा, शार्ङ्गधरा, उदारा श्रीकृष्णा धावत ये रे तुझे पद्मांकित पाय मला आठवतात पहा, त्यामुळे माझे हृदय विदीर्ण झाले आहे श्रीकृष्णा मी काय करू सांग? कृष्णा तुझ्यावाचून मी आंधळी झाली आहे रे! वनमाळी श्रीकृष्णा माझा हात धरायला धावत ये. मज आंधळ्याची काठी असलेला कृष्ण कुठे गेला? त्याला वैकुंठाला कुणी न्हेलं? आता मी पुढील वाटचाल कशी करणार? बाबा जगजेठी मला लवकर पाव. माझ्या नातवंडे आणि मुलाबाळांसकट सगळ्या वंशावळीची एकाचवेळी होळी झाली.
यदुकुळात कुणी म्हणून उरलं नाही असं म्हणून देवकी छाती पिटून रडू लागली. पुढे तिने विचारले, सगळे यादव कुठे पडले आहेत? अक्रुरा तुला कृष्णाने कुठून इथे पाठवले? त्याजागी मला लवकर घेऊन चल. सर्व लहानग्यांना मी शेवटचं पाहून घेईन. देवकीचे रुदन पाहून वसुदेवादि, उग्रसेन हे अत्यंत आक्रोश करत प्रभासाला जायला निघाले. स्त्रिया, पुरुष, सुहृद इत्यादि सगळे मिळून स्वगोत्र, स्वजन प्रभासाकडे निघाले.
सर्वांना कृष्णाच्या वियोगाचे अत्यंत दु:ख झाले असल्याने सगळेजण मोठ्याने रडत ओरडत, आक्रोश करत दु:खाने व्हिवळत निघाले. रणात पडलेल्या निष्प्राण यादवांची कलेवरे अत्यंत शोकमग्न वातावरणात त्यांनी पहिली. देवकी, रोहिणी, वसुदेव, उग्रसेन सर्वजण युद्धभूमीवर आले आणि यादवांच्या प्रेताच्या ढिगाऱ्यात श्रीकृष्ण आणि बलरामाचे शव शोधू लागले पण आश्चर्याची गोष्ट अशी की, ती दोघेही त्यांना तेथे आढळली नाहीत. आधीच कृष्ण, बलरामाच्या विरहाने ते सर्वजण व्याकूळ झाले होते. त्यात श्रीकृष्ण, बलराम ह्यांचे मृतदेहही तेथे नाहीत हे पाहून ते हतबद्ध झाले.
क्रमश:








