बाबुराव पुसाळकर स्मृतीप्रित्यर्थ लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजन
बेळगाव : ख्यात गायिका देवकी पंडित व संतुर वादक निनाद दैठणकर यांच्या गायन, वादनाचा लाभ बेळगावकरांना मिळणार आहे. कै. बाबुराव पुसाळकर स्मृतीप्रित्यर्थ संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे शुक्रवार दि. 15 रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. कलाकारांना प्रशांत पांडव, अभिनय रवंदे, कार्तिक स्वामी यांची वाद्याची साथ लाभणार आहे. गोविंद भगत निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
निनाद दैठणकर
निनाद यांचे वडील डॉ. धनंजय दैठणकर हे ज्येष्ठ संतुर वादक आहेत. आई डॉ. स्वाती दैठणकर या भरतनाट्याम निपुण आहेत. घरातच संगीताचा वारसा असल्यामुळे निनाद यांना बालपणीच संतुरचे शिक्षण मिळाले. गेल्या 12 वर्षांपासून ते संतुर शिकत असून भारती विद्यापीठातून त्यांनी संतुरमध्ये एमएची पदवी घेतली आहे. वयाच्या अठराव्या वर्षीच त्यांनी जाहीर मैफली केल्या. अनेक संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे वादन झाले आहे. अजय बक्षी स्मृती पुरस्कार, इंदुमती काळे युवा वाद्य वादक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत.
देवकी पंडित
शास्त्राrय व भावगीत गायनमधील एक अग्रगण्य नाव म्हणून देवकी पंडित परिचित आहेत. आई उषा यांच्याकडून त्यांनी प्रारंभीचे संगीत शिक्षण घेतले. वसंतराव कुलकर्णी, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. तसेच बबनराव हळदणकर यांचेही मार्गदर्शन घेतले. सुगम संगीतामध्ये त्यांनी सुधीर मोघे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी जाहीर मैफल केली. बाराव्या वर्षी पहिले ध्वनिमुद्रण केले. हृदयनाथ मंगेशकर यांच्यामुळे दूरदर्शनवर गाण्याची संधी मिळाली. जगभरात अनेक शहरांमध्ये त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. पार्श्वगायनही त्यांनी केले असले तरी त्यांचा मूळ पिंड हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताचाच आहे.









