कोल्हापूर / धीरज बरगे :
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे सभापती राहूल नार्वेकर यांनी आमदार विनय कोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 13 डी थिएटर आणि पन्हाळ्याचा रणसंग्राम लघुपटाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती लावली. तत्पुर्वी वारणानगर येथे झालेल्या वारणा सहकारी समुहाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रित करण्यामध्येही मुख्यमंत्री फडणवीस यांचे बहुमोल सहकार्य आमदार डॉ. कोरे यांना मिळाले. वारणा उद्योग समूहालाही आर्थिक पाठबळ देत साखर कारखाना, दूध संघ आर्थिक आरिष्टातून बाहेर काढण्यास फडणवीस यांची मदत मिळाली. त्यामुळे देवाभाऊंकडून सावकरांना राजकीय ताकद दिली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीक पाहता सहयोगी जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांचे भाजपमध्येही वजन वाढले आहे.
आमदार कोरे यांनी 1999 च्या विधानसभा निवडणुकीत पन्हाळा–गगनबावडा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रथमच निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी याच मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेले यशवंत एकनाथ पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर आमदार कोरे यांच्या राजकीय प्रवासाला गती मिळाली. पुढे 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनसुराज्यशक्ती पक्षाची स्थापना करत विधानसभा निवडणूक लढवली. यावेळी त्यांना अपारंपरिक ऊर्जा मंत्रिपदही मिळाले. त्यानंतर वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून आमदार कोरे यांनी जिल्ह्यात जनसुराज्य पक्षाचे जाळे विस्तारले.
जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, करवीर, शिरोळ तालुक्यात जनसुराज्यची ताकद आहे. मात्र मध्यंतरी सहकार क्षेत्राला ओळख देणारा वारणा उद्योग समूह आर्थिक अडचणीत सापडला होता. जिल्ह्याच्या राजकारणातील कोरे यांची ताकद लक्षात घेता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेचे वर्चस्व असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे पसरवण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कोरे यांना जवळ केले. केंद्राच्या माध्यमातून वारणा कारखान्याला आर्थिक रसद पुरवली. अन् 2014 पासून आमदार कोरे यांनी युती सरकारची वाट धरली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत नव्याने उदयास आलेल्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राच्या राजकारणात आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी कोरे यांची ‘सहकार आघाडी’ पाहता ते महाविकास आघाडीसोबत जातील, असे चित्र होते. मात्र या काळात राज्याच्या राजकारणात एकाकी पडलेल्या भाजपची साथ आमदार कोरे यांनी सोडली नाही. त्यामुळे भाजपचे नेते फडणवीस यांचा आमदार कोरे यांच्यावरील विश्वास अधिकच दृढ झाला. त्यानंतर विविध माध्यमातून फडणवीस आमदार कोरे यांना राजकीय ताकद देत आहेत.
- राजाराम कारखाना निवडणुकीत निर्णायक भुमिका
जिल्ह्याच्या राजकारणात कट्टर पारंपरीक विरोधक असलेल्या खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यासाठी राजाराम कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आमदार कोरे यांनी महाडिक गटाला पाठबळ दिले. त्यामुळे महाडिक गटाचा विजय सुकर झाला. त्यावेळीही आमदार कोरे यांची भुमिका निर्णायक ठरली होती.
- खासदार धैर्यशील मानेंच्या विजयात मोठा वाटा
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने काहीअंशी जनमताचा कौल असल्यामुळे देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी भाजपला एक–एक जागा महत्वाची होती. या निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने पराभूत होतील, असे वातावरण होते. त्यावेळी फडणवीस यांनी माने यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमदार कोरे यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे मतदारसंघात खासदार मानेंबाबत नाराजी असतानाही आमदार कोरे यांनी माझ्याकडे पाहून माने यांना मतदान करा, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यानुसार पन्हाळा तालुक्यातून माने यांना मताधिक्य देत शाहूवाडीतील माजी आमदार सत्यजीत पाटील यांना मोठ्या प्रमाणात मिळणारे मताधिक्य रोखल्यामुळे खासदार मानेंचा विजय सुकर झाला. फडणवीस यांनी सोपवलेली जबाबदारी आमदार कोरे यांनी पुन्हा एकदा चोख बजावली होती.
- मुख्यमंत्री फडणवीसांचे पाठबळ अधोरेखित
आमदार विनय कोरे यांच्यावर वेळोवेळी सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी चोख पूर्ण केल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासू नेत्यांच्या यादीत कोरे यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे कोरे यांचा शब्दही मुख्यमंत्री फडणवीस पडू देत नाहीत. नुकत्याच झालेल्या पन्हाळा महोत्सवास अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पन्हाळगडावर उपस्थिती लावत आमदार कोरेंना पाठबळ असल्याचे दाखवून दिले. त्याबाबत आमदार कोरे यांनीही आपल्या भाषणात उल्लेख केला होता. यामधून आमदार कोरे आणि फडणवीस यांच्यामधील सख्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.








