प्रतिनिधी /बेळगाव
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त रविवार दि. 10 रोजी एक विशेष कार्यक्रम लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र, बेळगाव प्रस्तुत करीत आहे. रसिक रंजन, बेळगाव निर्मित ‘देव वाणी-मंगल गाणी’ हा कार्यक्रम नाटय़-भक्ती आणि संगीताने युक्त आहे. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून सायंकाळी 4.30 वाजता टिळक चौक येथून प्रत्यक्ष पालखी आणि दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर दिंडी ही लोकमान्य रंगमंदिर येथील कार्यक्रमामध्ये समावि÷ होईल. त्यानंतर 5.30 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे मुख्य कार्यक्रम होईल.
‘देव वाणी-मंगल गाणी’ या नाटय़ाला सायंकाळी 5.30 वा. प्रारंभ होईल. सुमारे शंभर वर्षांपूर्वी बेळगाव हे छोटेखानी गाव होते. या गावात कानडी गावातून एक दिंडी एका रात्रीच्या मुक्कामाला थांबते. त्या एका रात्रीत दोन्ही गावचे वारकरी जो भक्तीचा अविष्कार घडवितात, तो या नाटकातून सादर करण्यात येतो. यामध्ये संवाद, नाटय़, भक्तीगीत, संगीत यांची रेलचेल आहे.
लेखन आणि दिग्दर्शन प्रा. अनिल चौधरी यांचे आहे. प्रसाद शेवडे, चैतन्य गोडबोले, श्रीवत्स हुद्दार, तन्मयी सराफ, सानिका ठाकुर, सोनाली पाटील, अब्दुल रहिम सिद्दीकी, रिहान मुल्ला हे गायनाची बाजू सांभाळतील. नारायण गणाचारी, तबला, पखवाज विकास नर, टाळ चिपळी दर्शन घाडीगांवकर, प्रफुल्ल गावडे आणि प्रसाद शेवडे हे ऑर्गन (पाय पेटी) साथ करतील.
रसिकांसाठी विनामूल्य कार्यक्रम
सदर कार्यक्रम हा रसिकांसाठी विनामूल्य असून, प्रथम येणाऱयास प्राधान्याने प्रवेश दिला जाईल, काही जागा राखीव असतील, याची सर्व रसिकांनी नोंद घ्यावी.हा कार्यक्रम लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., बेळगाव यांनी प्रायोजित केला आहे, तर विशेष सहाय्य मराठी भाषाप्रेमी मंडळ-बेळगाव आणि विवेकानंद को-ऑप. सोसायटी लि. बेळगाव यांचे आहे.









