मसुरे प्रतिनिधी
Deulwada Gram Panchayat Sarpanchpadi Suchita Wayangankar
मसुरे गावचे विभाजन होऊन चार वर्षापूर्वी देऊळवाडा ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन कोणत्याही पक्षीय बलाची जोड नघेता सर्व ग्रामस्थांनी बिनविरोध ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच ग्राम सदस्य यांची निवड श्री देव जैन भरतेश्र्वर ग्राम विकास पॅनलच्या नावाखाली करण्यात आली होती. त्यावेळी सरपंच पद हे ओबीसी महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे अडीच अडीच वर्षाचा कालखंड ग्रामस्थांच्या सर्वानुमते नेमून दिला होता.त्याप्रमाणे आज अडीच वर्षे पूर्ण होत आली आहेत. दुसऱ्या टर्ममध्ये नवनिर्वाचित सरपंच म्हणून सौ सुचिता सतीश वायंगणकर यांची निवड करण्यात आलेली आहे. सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. २ मे रोजी पंचायत समिती मालवण येथे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत सावंत यांच्याकडे सौ. सुचिता सतीश वायंगणकर यांचे सरपंच पदासाठी देऊळवाडा ग्रामस्थांच्या सर्वानुमते एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्याची ३ मे रोजी छाननी होऊन तो अर्ज कायम करण्यात आला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींवर राजकीय पक्षांमार्फत किंवा स्थानिक संघटना यांच्यामार्फत सरपंच पदासाठी निवडणुका लढवल्या जातात परंतु देऊळवाडा ग्रामपंचायत विभाजन होऊन या गावात असलेले सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन अनेक राजकीय विचारांचे लोक सुद्धा एकत्र येऊन सर्वानुमते कोणत्याही प्रकारची निवडणूक न लढवता पुन्हा एकदा ग्रामस्थांनी बिनविरोध सरपंच निवडला आहे. ही ग्रामपंचायत नवीन असूनही अशाप्रकारे बिनविरोध सरपंच निवडून देऊन जिल्ह्यात आदर्श पायंडा घातला आहे.









