संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड ः प्रतिस्पर्धी थापा यांचा 39 मतांनी पराभव
काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळमध्ये शेर बहादूर देउबा यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. सत्ताधारी नेपाळी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. नेपाळी काँग्रेसच्या प्रमुखांनी प्रतिस्पर्धी उमेदवार गगनकुमार थापा यांचा 39 मतांनी पराभव केला. नेपाळी काँग्रेसच्या सर्व 89 खासदारांनी मतदानात भाग घेतला. या मतदानात 76 वर्षीय देउबा यांना 64, तर गगनकुमार थापा यांना केवळ 25 मते मिळाली. संसदीय पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकीत थापा हे देउबा यांचे एकमेव प्रतिस्पर्धी होते. मंगळवारी दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
संसदीय पक्षाच्या नेत्यासाठी निवडणुका घेणारा नेपाळी काँग्रेस हा हिमालयीन देशातील एकमेव पक्ष आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नेपाळी काँग्रेसने प्रतिनिधीगृहात 89 जागा जिंकल्या. यापैकी 57 जागा पक्षाने थेट मतदानाद्वारे तर 32 जागा अनुपातित निवडणूक पद्धतीद्वारे (मतांच्या प्रमाणात) जिंकल्या. यापूर्वी रविवारी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी सर्व राजकीय पक्षांना सात दिवसात नवीन सरकार स्थापन करण्यास सांगितले होते.
सार्वत्रिक निवडणुकीत नेपाळी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर देउबा पुढील सरकारचे नेतृत्व करण्याचे जवळपास निश्चित समजले जात होते. आता संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवड केल्याबद्दल पंतप्रधान देउबा यांनी खासदारांचे आभार मानले. आपण विघटनमुक्त पक्ष उभारणीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “मला जिंकण्यासाठी सर्वांनी मदत केली. तुमचे खूप खूप आभार. आगामी काळात मी या पक्षाला चांगल्याप्रकारे पुढे नेईन आणि अडथळय़ांपासून मुक्त ठेवेन’’, असे देउबा म्हणाले.
संसदीय पक्षनेत्याच्या निवडणुकीत देउबा यांच्या नावाचा प्रस्ताव नेपाळी काँग्रेसचे ज्ये÷ नेते रामचंद्र पौडेल यांनी मांडला होता. या प्रस्तावाला पूर्ण बहादूर खडका यांनी पाठिंबा दिला होता. थापा यांच्या नावाचा प्रस्ताव डॉ. शेखर कोईराला यांनी मांडला, तर विश्व प्रकाश शर्मा, प्रदीप पौडेल आणि धनराज गुरुंग यांनी त्याला पाठिंबा दिला होता.









