तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीत परिपत्रके द्यावीत, तसेच व्यवहार मराठीत करावा यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
या आंदोलनासंदर्भात प्रत्येक गावामध्ये जनजागृती बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीच्या माध्यमातून जनजागृती करून मोठय़ा संख्येने या धरणे आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. घटनेनुसार आम्हाला आमच्या भाषेमध्ये मराठी परिपत्रके देणे बंधनकारक असताना जाणूनबुजून टाळाटाळ केली जात आहे. मात्र आता यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे काही कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आमदार मनोहर किणेकर, मनोज पावशे, ऍड. राजाभाऊ पाटील, संतोष मंडलिक, यल्लाप्पा रेमाण्णाचे, एस. एल. चौगुले, प्रकाश अष्टेकर, लक्ष्मण होनगेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी दिवंगत झालेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली. शेवटी सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी आभार मानले.









