प्रतिनिधी/ चिपळूण
वाशिष्ठी नदीत गतवर्षीच्या तुलनेत 10 टक्केही यंत्रसामुग्री गाळ काढण्यासाठी कार्यरत नाही. आतापर्यंत वर्षभरात अवघा 10 टक्केच गाळ काढला गेला असून उर्वरित गाळ उपसासाठी प्रशासन अजूनही गंभीर नाही. जलसंपदा विभागासह सारेच विभाग गाळ उपशासाठी अथवा त्यांच्या आवश्यक परवानग्या, रेखांकनसह तत्सम कामासाठी एकमेकांकडे बोट दाखवत चालढकल करत असल्याने 26 जानेवारीपासूनचे आंदोलन अधिक तीव्रतेने करण्याचा निर्धार बचाव समितीने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.
चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, अरूण भोजने, राजेश वाजे, किशोर रेडीज, उदय ओतारी, शहानवाज शहा, महेंद्र कासेकर आदींनी वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाची सद्यस्थिती आणि प्रशासनाकडून केले जात असलेले दुर्लक्ष याविषयी संताप व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, मुळातच जलसंपदा पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाची आकडेवारी मोठी देत असली तरी ती पूर्णतः खोटी आहे. आम्ही गेल्यावर्षापासूनच या आकडेवारीवर सातत्याने आक्षेप घेतला आहे. आमच्या मते अजूनही एकूण गाळ उपशाच्या केवळ 10 टक्केच काम झाले आहे. नदीपात्रातील गाळाची बेटे अजूनही काढलेली नाहीत. अलिकडच्या काळात विस्तारलेल्या मात्र खासगी सांगितल्या जाणाऱया बेटांचे रेखांकन अजूनही केलेले नाही. प्रत्येकवेळी गाळ उपशासंदर्भात होणाऱया तक्रारी आणि त्यासाठी आवश्यक परवानग्या, यासंबंधातील प्रत्येक विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहेत. एकूणच सध्याची परिस्थिती पाहिली तर प्रशासनाला खरंच गाळ काढायचा आहे की नाही, असा प्रश्न आमच्यासह चिपळूणकर नागरिकांना पडताना दिसत आहे.
चिपळूण पूर व कोळकेवाडी अवजल अभ्यास गटाच्या अहवालात ज्या शिफारशी, निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यावरही समितीचा आक्षेप कायम आहे. किंबहुना या अहवालाविरोधात वेळप्रसंगी न्यायालयाचेही दरवाजे ठोठावण्याची आमची तयारी सुरू आहे. गाळाने भरलेल्या नद्या पूर्वस्थितीत आणण्याचे एकीकडे अहवालात नमूद केले आहे. तरीही त्याकडे जलसंपदा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. चिपळूण परिसरात अनेकदा 250 मि.मी.हून पाऊस अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे चिपळूणकरांवर पुराची टांगती तलवार कायम राहणार आहे. गेल्यावर्षी पूर आला नाही म्हणून पुढे तो येणार नाही, असा भास चुकीचा आहे. गतवर्षी पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याचे आश्वासन मिळाले. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बेकायदा बांधकामे वाढत चालली आहेत. अधिकाऱयांना पुराचे गांभीर्य नसल्याने गाळ काढण्यास चालना मिळत नाही. आम्ही जनतेसाठी बांधील असल्यानेच चिपळूण व परिसरातील नागरिकांच्या हितासाठी 26 जानेवारीपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.
सतीश कदमांनीच चौकट मोडली
समितीची चौकट बापू काणे यांनी मोडली असल्याचा आरोप समितीचे सदस्य सतीश कदम यांनी मध्यंतरी पत्रकार परिषदेत केला होता. यावर बोलताना किशोर रेडीज म्हणाले की, वास्तविक चौकट मोडण्याचा श्रीगणेशा हा सतीश कदमांनीच केला. दिवाळीनंतर ते समितीच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. समितीला विश्वासात न घेता मोडक समितीच्या अहवालाला पाठिंबा दिला. ही समिती शहर व परिसरातील जनतेची आहे. येथे कोणी अध्यक्ष नाही अथवा पदाधिकारी. सर्वजण एक कुटुंब म्हणून काम करत असल्याचे रेडीज यांनी सांगितले.









