म. ए. समितीच्या बेळगाव दक्षिण-उत्तर मतदारसंघांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल : शक्तिप्रदर्शनात सीमाबांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग
प्रतिनिधी / बेळगाव
तळपत्या उन्हात मराठी भाषिकांनी अस्मितेचे दर्शन घडवत आपला विजय निश्चित असल्याचे दाखवून दिले. दक्षिण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर आणि उत्तर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी शक्तिप्रदर्शन करत गुऊवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत अमाप उत्साहात शक्तिप्रदर्शन करून राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची झोप उडविली आहे.

रणरणत्या उन्हातही स्वयंस्फूर्तीने दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील मतदारांनी आपला सहभाग दर्शविला. भगवा ध्वज घेऊन जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या शक्तिप्रदर्शनाच्या रॅलीमुळे सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही परिस्थितीत म. ए. समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार साऱ्यांनीच केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दक्षिण मतदारसंघातील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली. उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी बैलगाडीतून शेतकरी पेहराव करून शक्तिप्रदर्शनाला चालना दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून उत्तरचे अधिकृत उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली. यावेळी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आरटीओ सर्कल येथे जाऊन दोन्ही उमेदवारांचे समर्थक एकत्र जमून भव्य असे शक्तिप्रदर्शन केले. झांजपथकासह घोडे, बैलगाडी, शिवकालीन पोषाखांमध्ये कार्यकर्ते सामील झाले होते. त्यामुळे आकर्षक असे शक्तिप्रदर्शन दिसून आले.
घोषणांनी परिसर दणाणला
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. येळ्ळूर, अनगोळ, वडगाव, शहापूर, मच्छे, पिरनवाडी, झाडशहापूर, धामणे, खादरवाडी, मजगाव, जुने बेळगाव, होसूर व शहरातील सर्व वॉर्डमधील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग दर्शविला.
निवडणूक अधिकाऱ्यांकडे रमाकांत कोंडुस्कर आणि अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत किरण गावडे, शुभम शेळके, माजी महापौर शिवाजी सुंठकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









