तालुका म. ए. समिती-युवा आघाडीच्या संयुक्त बैठकीत कार्यकर्त्यांचा निश्चय
प्रतिनिधी/ बेळगाव
तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडीतर्फे रविवार दि. 12 जानेवारी रोजी युवा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार शनिवारी झालेल्या तालुका म. ए. समिती व युवा आघाडीच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. इंद्रप्रस्थनगर येथील तुकाराम महाराज भवनमध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. व्यासपीठावर सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर होते.
रविवार दि. 12 जानेवारी रोजी युवा दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने तळागाळातील युवकांना सीमालढा समजावा यासाठी हा मेळावा घेतला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर येथील प्रा. मधुकर पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. सीमालढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी युवकांची ताकद महत्त्वाची आहे. यासाठी युवकांना एकत्रित करून सीमालढ्यात सामावून घेतले जाणार आहे. गेली 69 वर्षे सीमावासीय अन्याय सहन करीत आहेत. हा लढा आता तरुणांना समजावून सांगितला पाहिजे. सीमालढ्याचा इतिहास तरुणांना समजावा यासाठी युवा आघाडीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.
सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासनावर दबाव आणण्यासाठी जनआंदोलन हाती घेतले जाणार आहे. यासाठी सीमाभागातील तरुणांची ताकद महत्त्वाची आहे. तरुणांना सीमाप्रश्न समजावून सांगण्याबरोबरच सीमाप्रश्नाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी हा मेळावा घेतला जात आहे. यामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सीमाप्रश्नाबाबतची तळमळ दाखवून द्यावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले आहे.
यावेळी माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर, मराठा बँकेचे संचालक लक्ष्मण होनगेकर, मल्लाप्पा गुरव, महेश पाऊसकर, लक्ष्मण पाटील, विठ्ठल पाटील, दीपक पाटील, विठ्ठल मजुकर, बी. एस. पाटील, भरमा मोहनगेकर, यांसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
तरुणांचाही उदंड प्रतिसाद
तालुका म. ए. समिती आणि युवा आघाडीतर्फे विभागवार गावोगावी युवा मेळाव्याबाबत जागृती केली जात आहे. तरुणांचाही या मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर भित्तीपत्रकांद्वारे जनजागृती केली जात आहे. शाळा, कॉलेज स्तरावरही जनजागृती करून मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले जाणार आहे.
17 जानेवारीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन
17 जानेवारी रोजी कंग्राळी खुर्द येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. कंग्राळी खुर्द येथे सकाळी 8.30 वाजता हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.









