तयारीला वेग, महामेळावा यशस्वी करून दाखविणार
बेळगाव : मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये दरवर्षी अधिवेशन भरविले जाते. यालाच विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करते. मागीलवर्षी महामेळावा होऊ नये, यासाठी आडकाठी घालण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यावर्षी महामेळावा करणारच, अशी ठाम भूमिका म. ए. समितीने घेतली आहे. त्यामुळे सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये होणाऱ्या महामेळाव्याच्या तयारीला वेग आला आहे. बेळगाववर आपला हक्क दाखवून देण्यासाठी कर्नाटकने हलगा येथे सुवर्णविधानसौध बांधली. त्यानंतर प्रत्येक वर्षी याठिकाणी अधिवेशन भरविले जाते. मराठी भाषिकांनी सुवर्णविधानसौधच्या बांधकामाला सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला. सुवर्णविधानसौधच्या उद्घाटनादिवशीही काळे झेंडे दाखवून आपला निषेध नोंदविण्यात आला. याचबरोबर प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांचे प्रतिअधिवेशन भरवून त्यामध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी सीमावासियांशी संवाद साधला जातो.
दरवर्षी व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरात महामेळावा आयोजित करण्यात येतो. मागीलवर्षी परवानगी नसल्याचे कारण देत पोलीस प्रशासनाने महामेळावा होऊ दिला नाही. दडपशाही करत म. ए. समितीचे नेते तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे सीमाभागात संतापाची लाट पसरली. महामेळाव्याला परवानगी नाकारल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. त्यामुळे आंतरराज्य बससेवेवरही परिणाम झाला होता. तसेच दोन राज्यांमधील तणाव वाढला होता. यावर्षीही कर्नाटक सरकारचे 4 डिसेंबरपासून बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. याविरोधात म. ए. समितीकडून महामेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. काळ्यादिनादिवशी झालेल्या सभेमध्येच महामेळावा होणार, हे जाहीर करण्यात आले होते. कितीही गुन्हे दाखल झाले तरी महामेळावा यशस्वी करणारच, असा निर्धार म. ए. समितीच्या नेत्यांनी केल्याने आतापासूनच महामेळाव्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.









