गणेशपूर स्मशानभूमीतील समस्यांकडे बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशपूर स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, पावसाळय़ात संपूर्ण परिसर चिखलमय बनत आहे. ये-जा करण्याचा रस्ताही खराब झाल्याने अंत्यविधीसाठी जाणाऱया नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता अंत्यविधी शेडवरील पत्रे देखील उडाले आहेत. याबाबत ग्रा. पं. कडे सातत्याने तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नाही.
गणेशपूर-सरस्वती नगर, पार्वती लेआऊट, क्रांतीनगर आदी परिसरातील नागरिकांना अंत्यविधी करण्यासाठी गणेशपूर येथील स्मशानभूमीत जावे लागते. याठिकाणी विविध समाजाच्या स्मशानभूमी आहेत. स्मशानभूमी सभोवती केवळ संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. मात्र अन्य सुविधांकडे बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळय़ात स्मशानभूमी रस्त्यावर गुडघाभर चिखल झाल्याने अंत्यविधीसाठी कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे येथील रहिवाशांनी ग्रामपंचायत अध्यक्षांसह पीडीओंकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र तक्रारी सोडविण्याऐवजी नागरिकांनाच दमदाटी करून परत पाठविले होते.
समस्यांचे निवारण करण्यास ग्रामपंचायत अपयशी
अंत्यविधी चौथऱयावरील छताचे पत्रेही उडाले आहेत. परंतु याकडे ग्राम पंचायतीने कानाडोळा केला आहे. गणेशपूर परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीला सरस्वती नगर, पार्वती लेआऊट, क्रांती नगर, गणेशपूर अशा विविध भागातील इमारतींची घरपट्टी मिळते. तरीही या परिसरातील नागरिकांसाठी विकासकामे राबविण्याकडे ग्राम पंचायतीने कानाडोळा केल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. स्मशानभूमीच्या विकासासह या परिसरातील समस्यांचे निवारण करण्यास बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत पूर्णपणे अपयशी ठरली आहे. लोकप्रतिनिधींसह जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी बेनकनहळ्ळी परिसरातील समस्यांची पाहणी करून आवश्यक उपाय योजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे.









