कोल्हापूर :
जिल्हा परिषद धनादेश अपहारप्रकरणी केवळ माहिती घेऊ नका मुंबईला पोलीस पाठवून संबंधित बँक खातेदाराची बँकेतून माहिती घेऊन त्याला ताब्यात घ्या, अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांना दूरध्वनीवरुन केली. तसेच हा प्रकार गंभीर असुन पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करत तपासामध्ये तत्परता दाखवणे आवश्यक असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बँक खाते आहे. जिल्हा परिषदेच्या धनादेश प्रकरणाची वेळोवेळी माहिती घेत आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी कार्यालयीन सुट्टी दिवशी 18 कोटी रुपयांचा जिल्हा परिषदेचा धनादेश आयडीएफसी फर्स्ट बँक शाखा साकीनाका यांच्याकडुन जिल्हा बँकेकडे प्रेझेंट झाला. कार्यालयीन सुट्टी असल्याने यादिवशी जि.प.मध्ये चेकबाबत चौकशी करता आली नाही. फेब्रुवारी व मार्च महिन्यात जि.प.च्या बँक खात्यामधून मोठे व्यवहार होत असतात. यामुळे हा धनादेश पास करण्यात आला. मात्र 21 रोजी पुन्हा आयसीआयसीआय बँकेतुन 19.98 कोटींचा जि.प.चा दुसरा धनादेश जिल्हा बँकेकडे आला.
यावेळी जि.प.कडे चौकशी केली असता हा अपहाराचा प्रकार समोर आला. जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखाधिकारी यांचे चेक बाहेर गेले कसे? असा प्रश्न उपस्थित करत याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांनी केली.
- जिल्हा बँकेच्या लिपिकाला नोटीस
जिल्हा बँकेचे लिपिक अजित पाटील यांनी फेब्रुवारी, मार्च महिन्यात जि.प.च्या बँक खात्यामधून मोठे व्यवहार होतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी धनादेश पास केला असल्याचे सांगितले. मात्र सुट्टीच्या दिवशी इतक्या मोठ्या रक्कमेचा धनादेश कोणतीही चौकशी न करता पास करणे चुकीचे असून याप्रकरणी जिल्हा बँकेचे लिपिक पाटील यांना नोटीस बजावली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
- देवस्थानकडून 14 कोटींची ठेव
शासकीय कर्मचारी, कार्यालये यांनी जिल्हा बँकेत बँक खाते सुरु करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार बँकेचे कर्मचारी शासकीय कर्मचारी, कार्यालये यांच्याकडे जिल्हा बँकेत खाते सुरु करण्याबाबत पाठपुरावा करत आहे. प. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने जिल्हा बँकेत खाते उघडले असून 14 कोटी रुपयांची ठेव ठेवली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
- आमदार विनय कोरेंसोबत चर्चा करणार
मयत शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत आमदार विनय कोरे यांच्यासोबत चर्चा करणार आहे. 12 ते 20 कोटी रुपयांपर्यंत रक्कम देण्याची बँकेची तयारी आहे. इतक्या रक्कमेत शेतकऱ्यांना विमा देणारी विमा कंपनी आमदार कोरे यांच्या संपर्कात असल्यास त्यांनी कळवावे. जिल्हा बँक मयत शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यास तयार असल्यासे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.








