विरोधी गटातील 4 नगरसेवकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
बेळगाव : महापालिकेच्या नगरसेवकांना मिळकतीचा तपशील देण्याची सूचना कौन्सिल विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार 58 पैकी 54 नगरसेवकांनीच आपल्या मिळकतीचा तपशील दिला आहे. मात्र, विरोधी गटातील चार नगरसेवकांनी अद्यापही मिळकतीचा तपशील दिलेला नाही. त्यांना अनेक वेळा सांगून देखील दुर्लक्ष केल्याने कौन्सिल विभागाकडून 54 नगरसेवकांच्या मिळकतींचा तपशील लोकायुक्तांना सादर करण्यात आला आहे. दरवर्षी नगरसेवकांना आपल्या मिळकतीचा तपशील सरकारला द्यावा लागतो. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातच महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून नगरसेवकांना लेखी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर सत्ताधारी गटाच्या नगरसेवकाकडून तातडीने माहिती सादर करण्यात आली. पण विरोधी गटाच्या नगरसेवकांनी माहिती देण्यास विलंब लावला. वारंवार विचारणा करून देखील केवळ 54 नगरसेवकांनीच मिळकतीचा तपशील दिला आहे. तर 4 नगरसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मिळकतीचा तपशील देण्यास टाळाटाळ केल्याने यापूर्वी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांनी विजापूर महापालिकेच्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यामुळे मिळकतीचा तपशील न दिलेल्या 4 नगरसेवकांवर देखील कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून 54 नगरसेवकांच्या मिळकतींचा तपशील लोकायुक्तांना सादर करण्यात आला आहे. तर 4 जणांनी तपशील दिला नसल्याचेही कळविण्यात आले आहे.
महापालिकेची आज सर्वसाधारण बैठक
महापालिकेची सर्वसाधारण बैठक शनिवार दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात होणार आहे. सदर बैठकीत गोडसेवाडी, दुसरा क्रॉस, मंडोळी येथे सिंगल लेआऊटमध्ये महापालिकेकडून 14 पीआयडी देण्यात आल्याबद्दल आणि उद्यमबाग येथील वेगा हेल्मेटची घरपट्टी वसुली घोटाळ्यावर विशेष करून चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर नालासफाई, गटारी, घरपट्टी वसुली, कंत्राटी पद्धतीवर कायदा अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, त्याचबरोबर इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे. मागच्या सर्वसाधारण बैठकीत टिळकवाडी क्लबवर मोठी घमासान चर्चा झाली होती. यावर महापालिका आयुक्तांनी आपल्या न्यायालयात सुनावणी घेऊन क्लबचा ताबा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर महापालिकेकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे टिळकवाडी क्लबच्या विषयावरून देखील सभा गाजण्याची शक्यता आहे. काही जण पत्रकार असल्याचे सांगत सभागृहात प्रवेश करत आहेत. मागच्या वेळी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत एका अनोळखी इसमाने नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कौन्सिल विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले होते. सभागृहात कोणालाही प्रवेश देण्यापूर्वी त्यांची ओळखपत्रे तपासण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे शनिवारच्या बैठकीला पत्रकारांचे ओळखपत्र तपासूनच त्यांना आत सोडले जाणार आहे.









