रत्नागिरी :
महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात 5 वर्षात 40 लाख कोटींचे उद्योग आणण्यात येणार आहेत. कोकणात सेमी कंडक्टर आणि संरक्षण विभागाला शस्त्रास्त्रे बनवणारे पर्यावरणपूरक प्रकल्प येऊ घातले आहेत. त्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही. पर्यावरणाचा समतोल राखून विकास झाला पाहिजे. कोकणात पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच काही कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री पवार हे सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी उद्यमनगर येथे एमआयडीसीच्या जागेत टाटा कौशल्य विकास केंद्र भूमिपूजन पवार यांच्याहस्ते पार पडले. केंद्राच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, टाटा उद्योग समुहाचे अधिकारी अनिल खेळापूरे यांच्यासह एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- रत्नागिरी कौशल्य केंद्रासाठी 197 कोटींचा होणार खर्च
रत्नागिरी येथे एमआयडीसी आणि टाटा टेक्नॉलॉजी संचालित कौशल्यवर्धन केंद्र 197 कोटी खर्च कऊन उभे राहात आहे. यात 31 कोटी राज्य सरकार तर 165 कोटी टाटाकडून दिले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. रत्नागिरी बदलत आहे. मिऱ्या–नागपूर महामार्गामुळे अनेक चांगले परिणाम भविष्यात दिसून येतील असे त्यांनी सांगितले. विमानतळाच्या टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे लवकरच विमाने उतरतील, त्यामुळे पर्यटनालाही फायदा मिळेल. उद्योजकही येतील त्याचा फायदा उद्योगधंदे वाढीसाठी होईल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
- रत्नागिरीत केंद्रामुळे रोजगाराची दारे खुली होणार
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांचे अनेक उद्योगपतींशी संबंध येत असतात. त्यावेळी गुंतवणूक व इन्फ्रास्ट्रक्चरवर चर्चा होत असते. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान आधारित कुशल मनुष्यबळाची गरज असते. अशा कौशल्यवर्धन केंद्रांमुळे भविष्यात सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. या कौशल्यवर्धन केंद्रामुळे तऊणांना संधीचे सोने करण्याची व रोजगाराची दारे उघडण्याची संधी मिळाली आहे. रत्नागिरीत कौशल्य विकसित करून जगाच्या पाठीवर कोठेही जाऊ शकतो किंवा स्वत:चे स्टार्टअपही सुरू कऊ शकतो असे ते म्हणाले.
- राज्यातील तिसरे कौशल्य विकास केंद्र रत्नागिरीत
सध्या तंत्रज्ञान युग असून उद्योगापासून जगात, देशात, राज्यात विविध तंत्रात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यादृष्टीने आता विद्यार्थ्यांनी घडले पाहिजे. पूर्वी शाळा, महाविद्यालयातील शिक्षणावर भर होता. आज स्पर्धात्मक युगात तांत्रिक प्रशिक्षण ही काळाची गरज बनली आहे. अशी केंद्रे तयार होणे आवश्यक आहे. राज्यातील हे तिसरे केंद्र आहे. यापूर्वी चंद्रपूर, त्यानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिह्यात आणि आता रत्नागिरीत कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी केली जात आहे. रतन टाटा आज हयात नसले तरी टाटा समुहाकडून अशी केंद्रे उभारण्याचे काम सुरू आहे.
- उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भरभरून कौतुक
पालकमंत्री उदय सामंत यांचे कौतुक करावे तेवढे थोडे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. सामंत यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. भविष्यात कल्याण डोंबवली, पुणे, शिर्डी, मराठवाड्यात संभाजीनगर, बुलढाणा अशी केंद्रे उभारली पाहिजेत असे पवार यांनी सांगितले. टाटा उद्योगसमूहाने अनेकांना घडविले आहे. उत्पादन क्षेत्रात आता आवश्यक कुशल कामगार, ऑपरेटर, कारागीर या स्किल सेंटरमधून उपलब्ध होतील. ज्यांनी महायुती सरकारला बहुमत दिले, विश्वास दाखविला त्यांचे ऋण अशा विकासात्मक कामांतून व रोजगाराच्या संधी निर्माण करून फेडले जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
- वर्षभरात कौशल्य विकास केंद्र तयार होणार– सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत उभ्या होत असलेल्या उद्योगांबद्दल माहिती दिली. येत्या वर्षभरात हे केंद्र तयार होईल. त्यामुळे येथील विद्यार्थ्याना, तरुणांना आता परदेशात जाण्याची गरज पडणार नाही. याठिकाणी एकावेळी सात हजार प्रशिक्षणार्थी नऊ अभ्यासक्रमात 20 अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी येथील केंद्रातच कौशल्य प्रशिक्षण घेता येणार असल्याचे सांगितले. सध्या शहरात कामे सुऊ असल्याने अस्ताव्यस्त दिसत आहे. पण भविष्यात कोकणातील तऊणांना रोजगार कोकणातच मिळेल आणि महाराष्ट्रातील एक सुंदर शहर म्हणून रत्नागिरीची ओळख होईल, असे सामंत यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
- उद्योगांना प्रोत्साहन देणारी रत्नागिरीची ओळख होईल–सुनील तटकरे
खासदार सुनील तटकरे यांनीही उद्योगमंत्री उदय सामंत यांचे तोंडभरून कौतुक केले. रत्नागिरीचे चित्र बदलण्यात उदय सामंत यांचा मोठा हात आहे. प्रदूषणविरहीत कारखानदारी कोकणात येतेय, त्यामुळे रोजगार उपलब्ध होईल. स्थलांतर थांबेल, उद्योगांना प्रोत्साहन देणारे शहर म्हणून रत्नागिरीची ओळख निर्माण होईल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.








