केरळच्या संशोधकांचा नवा निष्कर्ष : आतापर्यंतच्या समजुतींना धक्का देणारे प्रतिपादन
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या वायव्य भागात प्राचीन काळात नांदून गेलेली सिंधू संस्कृती हा आजही अनेकांच्या स्वारस्याचा विषय आहे. या प्राचीन संस्कृतीसंबंधी नवे संशोधन केले जात आहे. इसवी सन पूर्व 3 ते 4 हजार वर्षे या काळात भरभराटीला आलेली ही संस्कृती अचानक नाहीशी कशी झाली, हा आजही अभ्यासाचा विषय आहे.
नव्या संशोधनातून या समृद्ध संस्कृतीच्या विनाशासंबंधी नवे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. केरळ विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाने केलेल्या अगदी अलिकडच्या संशोधनात या संस्कृतीचा ऱ्हास आणि विनाश या संबंधी नवी माहिती हाती लागल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार ही संस्कृती अवकाशातून झालेल्या अशनीच्या पतनामुळे नष्ट किंवा विस्कळीत झाली असे या संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र, या निष्कर्षाला ठामपणा येण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता असून हे संशोधन सातत्याने होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अनेक समजुती चुकीच्या ठरणार?
चार हजार वर्षांपूर्वी मध्यपूर्व आणि गवताळ प्रदेशातून आलेल्या स्थलांतरित आर्यांनी या संस्पृतीवर आक्रमण केले आणि नष्ट केली, अशी समजूत प्रथम रुढ होती. तथापि, ती खोडसाळपणाने करून देण्यात आली होती, हे नंतर सिद्ध झाले आहे. त्यामुळे ही समजूत मानणारे इतिहासकार किंवा लोकही आता ती चुकीची असल्याचे मान्य करत आहेत. त्यानंतर आर्यांनी या संस्कृतीवर आक्रमण केले नव्हते, पण आर्य हे स्थलांतरित म्हणून भारतभूमीत आले अशी नवी समजूत रुढ करण्याचा प्रयत्न झाला. तथापि, आर्यांच्या स्थलांतराचेही पुरावे मिळालेले नाहीत. तसेच आर्य नावाचा कोणताही विशिष्ट वंश नाही, असेच सिद्ध झालेले आहे. आता झालेले नवे संशोधन या प्रचलित समजुतींना धक्का देणारे ठरेल असा दावा संशोधक करत असून या संशोधनासंबंधी उत्सुकता वाढीला लागली आहे.
चार वर्षांचे प्रयत्न
केरळ विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी केलेल्या संशोधनातून अशनीच्या पतनाचा पुरावा समोर आला आहे. सिंधू संस्कृतीची शहरे वायव्य भागांमध्ये होती. त्यांच्यातील सध्याच्या धोरवीरा येथे सापडलेले शहर सर्वात्तम मोठे होते. या शहरापासून केवळ 200 किलोमीटर अंतरावर साधारणत: सहा हजार वर्षांपूर्वी 300 ते 400 मीटर व्यासाचा अशनी अवकाशातून या भागात येऊन आदळला. त्याच्या धक्क्याने या भागात बराच उत्पात घडला होता. त्यामुळे त्याच्या जवळपास राहणाऱ्या लोकांना हा भाग सोडावा लागला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. यावर अधिक संशोधन केले जात आहे.
अशनी आणि उल्कापाताने सरोवर
अशनी उल्कापाताने लूना नावाचे सरोवर बनले आहे. तथापि, त्यावेळी या पतनामुळे भूभाग हादरला होता. परिणामी, सिंधू संस्कृतीच्या बऱ्याच लोकांनी भीतीपोटी अन्यत्र स्थलांतर केले असण्याची शक्यता आहे. तसेच या धक्क्यामुळे त्यांची शहरे आणि घरे हानीग्रस्त झाली असण्याचीही शक्यता आहे. अशा प्रकारे ती प्राचीन संस्कृती विस्कळीत होऊन नंतर नष्ट झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केरळ विद्यापीठाचे प्राध्यापक के. एस. रजीन कुमार यांनी या नव्या संशोधकाची माहिती देताना बऱ्याच शक्यता व्यक्त केल्या आहेत.
मोठे सरोवर
अशनी पतनाने 1.88 चौरस किलोमीटरचा मोठा ख•ा पडला होता. कालांतराने त्यात पाणी साचल्याने त्याचे सरोवर बनले. हे सरोवर आजही अस्तित्वात आहे. हा अशनीपात साधारणत: सहा हजार वर्षांपूर्वी झाला होता. आणि त्याचवेळी सिंधू संस्कृती तिच्या ऐन भरात होती. अशनी पतनाच्या घटनेनंतर मात्र, तिचा ऱ्हास होत गेला, हा कालानुक्रमही या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो, असे म्हणणे आहे.
नव्या संशोधनाचे नवे निष्कर्ष
ड सिंधू संस्कृतीच्या विनाशाच्या कारणांवर नव्या संशोधनातून प्रकाश
ड उल्का आणि अशनीच्या पतनामुळे ही समृद्ध संस्कृती झाली नष्ट
ड नव्या संशोधनामुळे नवा वादही निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त
ड केरळ विद्यापीठाच्या पुरातत्वतज्ञांचे हे संशोधन सध्या चर्चेचा विषय









