लोखंडी साहित्याची चोरी : ग्रामपंचायतीने कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथील वैकुंठधाम स्मशानभूमीची समाजकंटकांकडून नासधूस करून चोरी करण्यात आली आहे. परंतू ग्रा. पं. व गावातील युवक मंडळे मूग गिळूनच आहेत. तेव्हा या सर्वांनी या समाजकंटकांचा शोध लावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गावच्या उत्तर दिशेला वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. मृत व्यक्ती जमिनीवर लाकडांचे सारण रचून जाळण्यात येत होती. तेव्हा गावातील श्री कलमेश्वर पतसंस्था व हिंडाल्को कंपनीच्या मदतीने वैकुंठधाम स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करण्यात आले. तीन हेक्टरच्यावर विस्तार असलेल्या या स्मशानभूमीला सभोवती तारेचे कुंपण घालण्यात आले. तसेच मृत व्यक्ती जाळण्यासाठी चार लोखंडी पट्ट्यांचे स्टँड उभारुन स्मशानभूमीचे सुशोभिकरण केले. गावातील मृत व्यक्तींच्या अंत्यविधीला आलेले पै-पाहुणे स्मशानभूमीचे सुशोभिकरण पाहुन कौतुक करत होते. परंतू समाजकंटकांना याचे कोणतेच सोयरसूतक नसते. सुशोभिकरण केलेल्या स्मशानभूमीची नासधूस सुरू करून काळिमा फासण्याचे कार्य केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मृत व्यक्ती जाळण्याच्या स्टँडवरील प्लेटची चोरी
सौदर्यीकरणाच्या माध्यमातून स्मशानमध्ये मृत व्यक्ती जाळण्यासाठी चार लोखंडी स्टँड बसविण्यात आली आहेत. त्यापैकी एका स्टँडवरील मृत व्यक्ती जाळण्यासाठी बसविण्यात आलेली लोखंडी प्लेट चोरी केली आहे. तसेच इतर स्टँडच्याही प्लेट्स चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा अशा समाजकंटकांना त्वरित आवरणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
पाण्याच्या नळाचीही मोडतोड
मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या पै-पाहुण्यांना व गावातील नागरिकांना हात धुण्यासाठी स्मशानभूमीमध्ये पाण्याचा नळ बसविण्यात आला होता. थोडे दिवस नळाला पाणी येत होते. परंतू आता कित्येक दिवस झाले नळाला पाणी येणे बंद झाल्यामुळे मृत व्यक्तीचा अंत्यविधी झाल्यावर आलेल्या नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. ग्रा. पं. ने नळ सुरू करून पाण्याविना होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सोलार बॅटरीचीही चोरी
मृत व्यक्तीचा रात्रीच्या वेळी अंत्यविधी करण्यासाठी विद्युतखांब तसेच सोलार लाईटची ग्रां. पं. ने व्यवस्था केली होती. परंतू समाजकंटकांकडून विद्युत खाबांवरील बल्ब दगड मारुन फोडणे तसेच सोलार खांबाच्या बॅटरीची चोरी झाली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यविधी करताना मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात कार्य करावे लागत आहे. या समाजकंटकांचाही बिमोड करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गेटला कुलुप लावण्याची मागणी
गेटला कुलुप नसल्यामुळे समाजकंटकांचे फावत आहे. स्मशानमधील वस्तूंची चोरी करण्याबरोबर नासधूस करण्यापर्यंत त्यांची मजल जात आहे. तेव्हा स्मशान गेटला कुलुप लावून चावी एखाद्या व्यक्तीकडे देऊन अंत्यविधीवेळी त्या व्यक्तीकडून चावी आणणे, अशी सोय करून समाजकंटकांना बिमोड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.









