अखेर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली : पुन्हा एकदा पाकिस्तान जगासमोर तोंडघशी
वृत्तसंस्था इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नूर खान एअरबेसवरील भारताच्या हल्ल्याची कबुली दिली आहे. हल्ला झाल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी फोन करून यासंबंधी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर काही भागांना लक्ष्य केल्यामुळे बराच विनाश झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, पाकिस्तान हवाई दलाने स्वदेशी तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून देशाला वाचवले. चीनकडून मिळालेल्या जेट्सचाही वापर करण्यात आला, असा दावाही शरीफ यांनी केला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची कबुली पाकिस्तानने स्वत: दिली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या हल्ल्यात आपले अनेक हवाई तळ उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. विशेषत: नूरखान हवाई तळाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले. यापूर्वी पाकिस्तानी लोक विजयाचा आनंद साजरा करत होते. मात्र, आता पाकिस्तानने मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानची ही कबुली आता जगासमोर आली आहे. काल-परवापर्यंत काहीही झाले नाही असा आव आणणारा पाकिस्तान आता पंतप्रधानांच्या कबुलीमुळे कोंडीत सापडला आहे. यापूर्वी पाकिस्तानने भारताचे हल्ले रोखल्याचा दावा करत मोठी हानी लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताने हल्ल्याचे पुरावे सर्व ठिकाणांसह सादर केल्यामुळे पाकिस्तानला कबुली देण्यावाचून गत्यंतर उरले नव्हते.
शाहबाज शरीफ यांचा व्हिडिओ व्हायरल
शाहबाज शरीफ यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते 9 आणि 10 तारखेच्या मध्यरात्री सुमारे 2:30 वाजता लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी मला फोन करून भारताने नुकतेच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचे सांगताना दिसत आहेत. भारताने केलेल्या हल्ल्यावेळी एक क्षेपणास्त्र नूर खान एअरबेसवर पडले आहे आणि काही इतर भागातही पडले. आपल्या हवाई दलाने देशाचे रक्षण करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. तसेच चिनी लढाऊ विमानांवर आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून काही भारतीय क्षेपणास्त्रे रोखल्याचेही शरीफ म्हणत आहेत.
नूर खान एअरबेस का महत्त्वाचा?
नूर खान हा एक सामान्य एअरबेस नाही. हे पाकिस्तानच्या व्हीव्हीआयपी आणि उच्चस्तरीय लष्करी विमानचालनाचे केंद्र आहे. इस्लामाबादच्या जवळ असल्याने आणि त्याच्या दुहेरी भूमिकेमुळे हे एअरबेस पाकिस्तानच्या सर्वात संवेदनशील एअरबेसपैकी एक आहे. हल्ल्यांनंतर आतापर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व उपग्रह प्रतिमांवरून हे स्पष्ट होते की भारतीय हवाई दलाने पूर्ण अचूकतेने हल्ला केला होता. कुठेही लक्ष्य चुकल्याचे दिसून आले नाही. इस्लामाबादजवळील नूर खान एअरबेस पाकिस्तान हवाई दलाच्या (पीएएफ) ऑपरेशन्सना चालना देतो. तसेच देशातील सर्वोच्च व्हीव्हीआयपी हवाई वाहतुकीसाठीही वापरतात.









